‘सिंघम’ मध्ये मराठी कलाकारांचा सिंहाचा वाटा

July 10, 2011 11:00 AM0 commentsViews: 7

मनाली पवार, मुंबई

10 जुलै

रोहित शेट्टीचा सिंघम हा सिनेमा 22जुलैला रिलीज होत आहे. अजय देवगणच्या बाजीराव सिंघम या मराठमोळ्या भुमिकेसह सिनेमाशी एकूण 19 मराठी कलाकार जोडले गेले.

रोहित शेट्टीच्या सिंघम या सिनेमात अजय देवगण आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहे. अजयने मराठमोळा पोलीस बाजीराव सिंघम साकारला आहे. अजयसह एकूण 15 मराठमोळे चेहरे या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि तेही महत्त्वाच्या भुमिकेत.

हिंदी सिनेमात मराठी चेहरा हे समीकरण जरी नवं नसलं तरी एकाच वेळी 15 मराठी कलाकारांचा सहभाग हे मात्र सिंघमच्या निमित्ताने पहिल्यांदाच होते. सिनेमाची कथा ही महाराष्ट्रावर आधारित असून अशोक सराफ,सचिन खेडकर,सोनाली कुलकर्णी,हेमू अधिकारी, अनंत जोग, विजय पाटकर, जयंत सावरकर, सुहासिनी देशपांडे,मेघना वैद्य, अशोक समर्थ, किशोर नांदलस्कर, अगस्थ्या धानोरकर, सुचित्रा बांदेकर, रविंद्र बेर्डे, आणि प्रदिप वेलणकर असे मराठी सिनेइंडस्ट्रीतील नामवंत कलाकार या सिनेमात पाहायला मिळतील.

हे तर झाले पडद्यावरचे कलाकार. पण पडद्यामागेसुद्धा काही मराठी नावं या सिनेमाशी जोडली गेली आहे. गायक -संगीतकार अजय-अतुल या सुप्रसिद्ध जोडीने सिंघमला संगीत दिलं आहे. तर गीतकार आहे स्वानंद किरकिरे आणि सिनेमाचे आर्ट डिझाइन नरेंद्र राहुरीकरने केलं आहे.

तमिळ भाषेत सिंघम म्हणजे सिंह. सिनेमाच्या नावाप्रमाणेच आपले मराठी कलाकार नेहमीच बॉलीवुडमध्येसुद्‌धा सिंहाचा वाटा उचलतात.

close