विनाशकारी प्रकल्पाविरोधातली सभा राणे समर्थकांनी उधळली

July 10, 2011 12:11 PM0 commentsViews: 4

10 जुलै

कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समितीची सर्वसाधारण सभा रत्नागिरीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावली. रत्नागिरी नगरवाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या या सभेत कोकणातल्या पर्यावरणवादी तसेच उर्जा आणि मायनिंग प्रकल्पविरोधी संघटानांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

यावेळी नारायण राणे आणी निलेश राणे जिंदाबादच्या घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही सभा उधळली. सभेला आलेल्या सिंधुदुर्ग आणि रायगड मधल्या प्रकल्पविरोधी संघटनांच्या प्रतिनिधींनाही या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बाहेर काढलं. बाहेरील पर्यावरणवादी संघटना रत्नागिरीत येऊन लोकभावना प्रक्षुब्ध करतात असा आरोप करत या कार्यकर्त्यांनी वैशाली पाटील, अमजद बोरकर आणि अन्य नेत्यांना सभा स्थानातून निघून जाण्यासाठी घेराव घातला.

ही घटना म्हणजे सत्ताधारी पक्षांनेच लोकशाहीचा गळा घोटण्याची आहे असा खेद व्यक्त करत शेवटी ही सभा रद्द करण्यात आली. मात्र याही पुढे अशा प्रकारची कोणतीही सभा यापुढे रत्नागिरी शहरात होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.

close