डॉमिनिका टेस्टमध्ये भारताचे पारड जड

July 10, 2011 1:21 PM0 commentsViews: 3

मनिष कुलकर्णी, मुंबई

10 जुलै

डॉमिनिका टेस्टवर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. दुसर्‍या इनिंगमध्ये वेस्टइंडिजने भारतावर 81 रन्सची आघाडी घेतलीय पण त्यांचे 6 बॅट्समन आऊट झाले आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी विंडीज इनिंग झटपट गुंडाळत टेस्ट सीरिज जिंकण्याची चांगली संधी भारताकडे आहे.

वेस्ट इंडिजविरुध्दच्या तिसर्‍या टेस्ट मॅचमध्ये भारताचे प्रमुख बॅट्समन चमकले. तब्बल चार बॅट्समनने हाफसेंच्युरी ठोकली. आणि याच जोरावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 347 रन्स करत विंडीजवर 143 रन्सची आघाडी घेतली. मॅचच्या तिसर्‍या दिवस अखेर 6 विकेट गमावत 308 रन्स अशा भक्कम स्थितीत असणार्‍या भारतीय टीमने चौथ्या दिवशी आणखी 39 रन्सची भर घातली.

चौथ्या दिवसाची सुरुवात झाली हरभजन सिंगच्या विकेटनं. यानंतर कॅप्टन महेंद्रसिंग धोणीही 74 रन्सवर आऊट झाला. नवव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या प्रवीण कुमारने फटकेबाजी करत स्कोर वाढवला. 27 बॉलमध्ये त्याने 26 रन्स केले. ईशांत शर्मा मैदानावर केवळ हजेरी लावून गेला.

फिडेल एडवर्ड वेस्टइंडिजतर्फे सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने तब्बल 5 विकेट घेतल्या. दुसर्‍या इनिंगमध्ये बॅटिंगला आलेल्या विंडीजची दुसर्‍या इनिंगमध्येही घसरगुंडी उडाली. ईशांत शर्माने ओपनिंगला आलेल्या पॉवेलला आऊट करत विडीजला पहिला धक्का दिला. तर प्रवीण कुमारने आंद्रे बराथची विकेट घेतली. डेरेन ब्राव्होला हरभजन सिंगने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला आणि विंडीजची अवस्था झाली 40 रन्सवर 3 विकेट.

पण यानंतर चौथी विकेट मिळवण्यासाठी भारतीय बॉलर्सना बरीच वाट पहावी लागली. क्रिक एडवर्ड आणि शिवनारायण चंद्रपॉलने चौथ्या विकेटसाठी तब्बल 161 रन्सची पार्टनरशिप केली. एडवर्डने शानदार सेंच्युरी ठोकली. तर चंद्रपॉलनंही आपली हाफसेंच्युरी पूर्ण केली. पण हरभजन सिंगने एडवर्डची विकेट घेत ही जोडी फोडली आणि पाठोपाठ मार्लन सॅम्युअललाही त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला.

हरभजन सिंगच्या या कामगिरीने भारताने मॅचवर पुन्हा वर्चस्व मिळवले. चौथ्या दिवसअखेर विंडीजने 6 विकेट गमावत 224 रन्स केलेत आणि भारतावर 81 रन्सची आघाडी घेतली. मॅचचा आणखी एक दिवस बाकी असून विंडीजची इनिंग झटपट गुंडाळत सीरिज जिंकण्याची चांगली संधी भारताकडे आहे.

close