मुंबईत झालेल्या 7/11 बॉम्बस्फोटांना उद्या पाच वर्ष पूर्ण

July 10, 2011 5:26 PM0 commentsViews: 18

सुधाकर कांबळे, मुंबई

10 जुलै

मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांना उद्या पाच वर्ष होत आहेत. या बॉम्बस्फोट प्रकरणात 13 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात अनेक अडचणी आल्यात मात्र यानंतर ही कोर्टांने या खटल्यास महत्त्व देऊन खटल्याचे कामकाज जलदगतीने सुरु आहे. या खटल्याचा निकाल येत्या सहा महिन्यात येण्याची शक्यता आहे.

जुलै 2006 रोजी झालेल्या बॉम्ब स्फोटाने अख्खी मुंबई हादरली होती. मुंबई 1993 सालात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर त्या दिवशी सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. त्यामुळे या घटनेच्या खटल्याकडे लोकांचे लक्ष लागलं आहे. सुरुवातीला हा खटला प्रचंड रेंगाळला होता.आरोपी कधी कोर्टाबाबत असमाधानी होते तर कधी त्यांच्यावर करण्यात आलेल्या मोक्का कारवाई आव्हान देत होते. प्रकरण सुप्रीम कोर्टात ही गेलं होतं. अनेक अडथळे पार केल्यानंतर अखेर या घटल्याचे कामकाज वर्षभारपूर्वी सुरु झालं.

या खटल्यात 13 आरोपी आहेत. या पैकी 12 जणांनी कबुलीजबाब दिला आहे. यात 350 साक्षीदार आहेत. त्यापैकी 142 साक्षीदार बॉम्बस्फोट झालेल्या डब्यात होते. ते जखमी झालेत. पण त्यांनी आरोपींना पाहिलेलं नाही. त्यांच्या साक्षी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्यात आल्यात. त्याच प्रमाणे 110 जणांच्या साक्षीही झाल्या आहेत. यामुळे आता पर्यंत अडीचशे लोकांच्या साक्षी झाल्या आहे. आता अंदाजे 100 जणांच्या साक्षी बाकी आहेत.

आता पर्यंत झालेल्या साक्षी गेल्या सात आठ महिन्यात झाल्या. त्यामुळे खटल्याचे कामकाज जलदगतीने सुरु असल्याने ते शक्य झालं आहे.अशाच गतीने कामकाज सुरु राहिल्यास खटला पुढच्या पाच महिन्यात संपणे शक्य आहे असं खटल्याशी संबधीत व्यक्तिंचं म्हणणं आहे.

close