जे.डे हत्याप्रकरणी सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

July 11, 2011 3:10 PM0 commentsViews: 6

11 जुलै

पत्रकार जे.डे हत्याप्रकरणी सर्व आठ आरोपींच्या पोलीस कोठडीत 18 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने निर्णय दिला. या सर्व आरोपींना गेल्या आठवड्यात मोक्का लावण्यात आला. यात बुकी विनोद चेंबूर आणि छोटा राजनचा गुंड सतीश काल्या याचा समावेश आहे.

मागील आठवड्यात मोक्का लावण्यात आला. मोक्का लावल्यानंतर या सगळ्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 11 जूलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. मिड डे चे जेष्ठ पत्रकार जे. डे यांची 11 जून रोजी हत्या झाली होती. त्याप्रकरणी विनोद असरानी उर्फ विनोद चेंबूर या बुकीसह आणखी 7 जणांना अटक करण्यात आली.

विनोद चेंबूर हा बिल्डरही आहे आणि त्याचे छोटा राजनशी थेट संबंध असल्याचा आरोप आहे. छोटा राजनचा गुंड सतीश काल्याला त्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. छोटा राजनलाही याप्रकरणात आरोपी करण्यात आलंय. छोटा राजन आणि विनोद चेंबूर हे संवाद साधण्यासाठी स्पाय कार्डचा वापर करत होते. ते स्पाय कार्ड शोधण्याचे काम सध्या पोलीस करत आहे.

close