गुरूदास कामत यांचा राजीनामा

July 12, 2011 12:48 PM0 commentsViews: 2

12 जुलै

पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारमधील आज नव्या मंत्रीपदाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा पार पडला. मात्र पक्षांने दिलेल्या पदामुळे नाराज झालेल्या गुरूदास कामत यांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. गुरुदास कामतांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. हायकमांडच्या आदेशानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.

आज झालेल्या शपथविधीला कामत गैरहजर राहिल्याने हायकमांडने संतप्त होऊन हा निर्णय घेतला. कामत यांना यापूर्वीच हायकमांडने इशारा दिला होता. कामत केंद्रीय गृह आणि दूरसंचार राज्यमंत्री होते. विस्तारानंतर कामतांकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला होता.पण यावर नाराजी व्यक्त करत कामत आज शपथवीधीला गैरहजर राहिले.

कामतांची सारवासारव

'मी स्पष्ट करू इच्छितो की मी आज सकाळीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग या दोघांना पत्र लिहिलं होतं, आणि मला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती केली होती. कारण मला सक्रिय पक्षकार्य करण्याची इच्छा आहे. मी खातेवाटपावरून नाराज असण्याचा प्रश्नच नाही. मला जे खातं देण्यात आलंय ते महत्त्वाचे असून देशातल्या मोठ्या समाजावर प्रभाव टाकणारे आहे. मी राजीनामा देण्याचे कारण पूर्णपणे व्यक्तिगत आहे. पक्षनेतृत्वाचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही. मला सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि तो यापुढेही कायम राहील.'

close