डाव्या पक्षांची सभा उधाळण्याचा राणे समर्थकांचा प्रयत्न

July 12, 2011 3:46 PM0 commentsViews: 2

12 जुलै

रत्नागिरीत आज पुन्हा एकदा राणे समर्थक कार्यकर्त्यांनी गदारोळ घातला. जैतापूरच्या दौर्‍यावर आलेल्या डाव्या पक्षांच्या नेत्यांची सभा राणे समर्थकांनी उधळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. 50 ते 60 राणे समर्थकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेकाप या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज जैतापूर परिसराचा दौरा केला. प्रकल्पस्थळाला भेट दिली. तसेच या नेत्यांनी साखरी नाटे गावातील मच्छिमारांसोबत बैठक घेतली. अणुऊर्जा प्रकल्पामुळे कोसळणार्‍या समस्येची माहिती या मच्छिमारांनी दिली.

जैतापूरसह देशात होऊ घातलेल्या सर्वच अणुऊर्जा प्रकल्पाला डाव्या पक्षांचा विरोध आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात या विरोधात पुन्हा आवाज उठवू तसेच देशव्यापी आंदोलनाची रणनितीही आखू अशी प्रतिक्रिया माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी दिली.

यानंतर पक्षाच्या वतीने घेण्यात आलेली सभा राणे समर्थकांनी उधळण्याचा प्रयत्न केला. दोनच दिवसांपूर्वी कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समितीची सभासुद्धा राणे समर्थकांनी उधळली होती. रत्नागिरीच्या बाहेरच्या लोकांची सभा रत्नागिरीत होऊ देणार नाही अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. आणि आज डाव्या पक्षांची सभा या कार्यकर्त्यांनी उधळली.

close