जयराम रमेश यांना शिक्षा आणि बक्षीस ?

July 12, 2011 5:54 PM0 commentsViews: 2

12 जुलै

पर्यावरण मंत्रालयातून जयराम रमेश बाहेर गेले आहे. त्यांच्याजागी आता जयंती नटराजन नव्या पर्यावरण मंत्री झाल्या आहेत. पर्यावरणाच्या मुद्द्यावर अनेक प्रकल्पांविरोधात जयराम यांनी घेतलेल्या कडक भूमिकेची त्यांना शिक्षा मिळाली असं काही जणांना वाटतंय. तर ग्रामविकास मंत्रालय देऊन त्यांना बढती देण्यात आल्याचं काही जणांचं म्हणणं आहे.

नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले मंत्री म्हणजे जयराम रमेश. जिथे जातील तिथं त्यांनी हेडलाईन्स निर्माण केल्या. पण त्याचबरोबर कमी दर्जाच्या समजल्या जाणार्‍या पर्यावरण मंत्रालयाचा त्यांनी चेहरामोहरासुद्धा बदलला. त्यांच्या काळात पर्यावरण मंत्रालय रबर स्टॅम्प मंत्रालय ते सक्रीय मंत्रालय बनले. पण, त्यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर अनेक प्रकल्पांबाबत घेतलेल्या कडक भूमिकेमुळेच त्यांचे खातं गेल्याची चर्चा आहे.काही प्रकल्पांबाबतीत जयराम रमेश यांचा आपल्याच मंत्रिमंडळातल्या सहकार्‍यांशी वाद झाला.

जयराम यांचे वाद- कोळसा उत्खननासाठी त्यांनी गो आणि नो गो असे दोन विभाग पाडले, त्यामुळे कोळसा मंत्रालयाशी त्यांचा वाद झाला – मध्य प्रदेशातल्या दोन व्याघ्रप्रकल्पातून जाणार्‍या हायवेच्या विस्ताराला त्यांनी नकार दिला – वेदांत आणि लवासा या मोठ्या प्रकल्पांना त्यांनी केलेल्या विरोधामुळे बराच वाद झाला.

पर्यावरणाच्या मुद्द्यावर जयराम रमेश यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे सुरुवातीला पर्यावरणावाद्यांनी त्यांचे कौतुक केलं. पण, लवकरच या कठोर समजल्या जाणार्‍या मंत्र्यांना दबावापुढे झुकावं लागलं. वादग्रस्त पास्को प्रकल्पाला त्यांनी हिरवा कंदील दिला. तसेच अगोदर नाकारलेल्या घनदाट जंगलातील अनेक कोळसा प्रकल्पांनाही मंजुरी दिली.

पण, जयराम रमेश यांना आता मिळालेलं ग्रामविकास मंत्रालय म्हणजे त्यांचे प्रमोशन असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं. त्यांना केवळ कॅबिनेटच पद नव्हे, तर त्यांना सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासोबत जवळून काम करण्याची संधी मिळाल्याचं म्हटलं जातं आहे.

शिक्षा की बक्षीस चर्चा काहीही असो पर्यावरण मंत्रालयासारख्या दुर्लक्षित खात्याला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याचे श्रेय जयराम रमेश यांनाच जातं, हे मात्र निश्चित.

close