स्फोटांना परप्रांतीय लोंढे जबाबदार – राज ठाकरे

July 14, 2011 12:41 PM0 commentsViews: 56

14 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांवर बोलताना मनसे नेते राज ठाकरे यांनी त्याचं खापर परप्रांतियांच्या लोंढ्यावर फोडलं. बाहेरून येणारे लोंढे थांबल्याशिवाय अशा घटना थांबणं शक्य नाही. पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणेला दोष देऊन काही फायदा नाही. जोपर्यंत परप्रांतियांचे लोंढे थांबवले जात नाही तोपर्यंत बॉम्बस्फोटांच्या घटना होतच राहणार अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपलं मत मांडलं आहे. दादर येथील आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपल्या देशात होणारे बॉम्बस्फोट हे अगदी सर्रास होतात. आणि या स्फोटात कोणीही आरोपी सापडले तर त्यांना फासावर लटकवले जात नाही. किंवा कडक शिक्षा देण्याचे नियोजनही दिसत नाही. बाहेरच्या राज्यातून येणार्‍या परप्रांतीय लोंढ्यांना जोपर्यंत थोपवलं जात नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना थांबणार नाहीत. असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसंच परप्रांतियांचा सगळ्यात मोठा वर्ग हा ठाणे जिल्ह्यात आहे.आणि आताची जी घटना घडली आहे, त्यांची चर्चा ही ठाणे आणि नवी मुंबईशी जोडली जात आहे. आणि इतकं मोठं स्थलांतरीत लोकांचं प्रमाण याच भागात आहे. बुधवारी घडलेल्या बॉम्बस्फोटांसाठी पोलिसांना, गुप्तचर विभागाला आपण किती दिवस दोष देत राहणार आहोत असा सवाल करत राज यांनी आपला परप्रांतियांचा मुद्दा ठासून सांगितला. मुंबईत दररोज रेल्वेने, ट्रकने लोंढे येतात याची कधी चौकशी होते का ? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात सत्ता द्या, मुंबईत येणार्‍या परप्रातियांच्या लोंढ्यांना आळा घालून दाखवतो असं आश्वासन राज ठाकरे यांनी यावेळी दिलं.

close