स्फोटांसाठी गाड्याचा वापर ; तपासासाठी 12 पथकांची स्थापना

July 15, 2011 4:56 PM0 commentsViews: 11

15 जुलै

मुंबईत बुधवारी झालेल्या साखळी स्फोटाप्ररकरणी तपास पथकांच्या हाती आता काही पुरावे लागत आहेत. झवेरी बाजारमध्ये एक ऍक्टिव्हा स्कूटर सापडली आहे. तर ऑपेरा हाऊसमध्ये एक स्प्लेंडर सापडली. स्फोटकं ठेवण्यासाठी या गाड्यांचा वापर झाल्याचा संशय आहे. तपासातून काही ताजी माहिती समोर आली आहे.

झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर या तीन ठिकाणी झालेले स्फोट रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने घडवण्यात आले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली. स्फोटाच्या ठिकाणच्या कचर्‍यात अमोनियम नायट्रेटसोबतच टीएनटी हे स्फोटक केमिकलही सापडलं. फॉरेन्सिक टीम्सनी तिन्ही ठिकाणाहून रक्ताचे नमुने, स्फोटकांचे अवशेष जमा केले आहे.

तसेच तिन्ही ठिकाणच्या सीसीटीव्ही फूटेजची बारकाईने पाहणी करणं सुरू आहे. त्यातूनही काही महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते असं केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी सांगितले. स्फोटात नक्की कोणती स्फोटक वापरण्यात आली आहेत याबाबतचा अहवाल उद्या पर्यत येण्याची शक्यता आहे.

या हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय पातळीवर सुरू झाला आहे. तपासासाठी 12 पथक स्थापन करण्यात आली आहेत. त्यात एटीएस आणि नॅशनल इन्वेस्टिगेशन टीम, आणि मुंबई पोलिसांचा समावेश आहे. एटीएस तसेच क्राईम ब्रांचची चार पथक राज्याच्या बाहेर तपासासाठी गेली आहेत.

प्रामुख्याने गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेशमध्ये बॉम्बस्फोटाचे धागेदोरे शोधण्याचं काम सुरू आहे. पण अजूनपर्यंत कोणत्याचं संघटनेनं या स्फोटाची जबबादारी घेतलेली नाही. दहशतवादाचे देशांतर्गत मॉड्युल या तपासातून समोर आलं आहे. मानखुर्दमधून गेल्या आठवड्यात दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांचीही आज पोलिसांनी चौकशी केली.

दुसरीकडे एनआयएच्या पथकाने रांचीतल्या सिमी म्हणजेच स्टुंडट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याच्या घरावर आज छापा टाकला. आणि मंझर इमाम नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं.

मंझर हा सिमीच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत असल्याचा संशय आहे. त्याचा इंडियन मुजाहिद्दीनशीही संबंध असल्याचं बोललं जातं आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांना मंझर पैसा पुरवण्याचंही काम करतो. मुंबईतल्या स्फोटात इंडियन मुजाहिद्दीनचाच हात असल्याचा संशय आहे.

तसेच दिल्ली पोलिसांनी मुंबई स्फोटाच्या तपासात मदतीसाठी एक पथक पाठवलं आहे. हे पथक मुंबई, जामा मस्जिद आणि हायकोर्टात झालेल्या स्फोटात साम्य आहे का? हेही पडताळणार आहे. उत्तरप्रदेश पोलीस, मुंबई पोलिसांना काही व्हिडिओ क्लीपींग्ज आणि माहितीही देणार आहे. वारणसी आणि जामा मस्जिद स्फोटाच्यावेळी मुंबईतून ई-मेल्स आले होते त्यामुळे या स्फोटांची तार जुळते का हे पाहण्यासाठी मुंबई पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांकडे ही माहिती मागितली.

close