नियम धाब्यावर बसवून महाराष्ट्र प्रदूषण मंडळात नोकरभरती

July 16, 2011 12:10 PM0 commentsViews: 10

संजय वरकड, औरंगाबाद

16 जुलै

माहिती अधिकारामुळे आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आलं आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोकरभरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झालं आहे. प्रदूषण मंडळाने केलेली भरती प्रक्रिया सगळे नियम धाब्यावर बसवून करण्यात आली. त्यामुळे या सगळ्या घोटाळ्याचे बिंग फुटले.

जीवन राजपूत हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 2009 च्या नोकर भरतीतले ते एक उमेदवार होते. सगळं काही असूनही त्यांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकारातून नोकरभरतीची माहिती काढायला सुरुवात केली. त्यातून बाहेर आलेल्या अनेक गोष्टींमुळे भरती प्रक्रियेतल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला.

2009 मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फिल्ड ऑफिसर पदांची भरती प्रकिया पार पडली. त्यासाठी जानेवारी 2009 मध्ये वर्तमानपत्रांमधून निनावी जाहिरात दिली. एखाद्या बोगस कंपनीनं जाहिरात द्यावी तशी. आणि इथूनच या घोटाळ्याला खरी सुरुवात झाली. या जाहिरातीत ना मंडळाचा उल्लेख होता ना मंडळाचा पत्ता. या जाहिरातीबरोबर अनेक गोष्टीत अधिकार्‍यानी नियम धाब्यावर बसविले.

- मंडळाने 34 जागांची जाहिरात देऊन 114 जागा भरल्या. – एन्प्लायमेंट ऑफिसकडून उमेदवारीची यादी न मागवताच भरती प्रक्रिया पार पाडली.- महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर भरती प्रक्रियेची जाहिरात दिली नाही.- प्रत्येक उमेदवाराला पाचही सदस्यांनी समान गुण देण्याचा पराक्रमही केला. – निवड यादीत नाव नसलेल्यांची नियुक्ती केली तर निवड यादीतील उमेदवारांना डावललं गेलं.- गैरहजर उमेदवारालाही गुण दिले गेले- एवढंच नाही तर – जातीचे प्रमाणपत्र नसतानाही जातीच्या आरक्षणातून नियुक्ती केली गेली

हा सगळा घोटाळा आपल्याला हव्या असणार्‍या आणि नात्या गोत्यातील लोकांची नियुक्ती करण्यासाठी केल्याचा आरोप होतोय. त्यामुळे जीवन राजपूत सारख्या अनेक उमेदवारांवर अन्याय झाला. तेव्हा सगळे नियम धाब्यावर बसवून आपलं उखळ पांढरं करून घेणार्‍या त्या भ्रष्ट अधिकार्‍यांवर आता सरकार काय कारवाई करतंय हे बघणं महत्त्वाचं आहे.

close