सारेगमपच्या मंचावर ‘सिंघम’कारांची हजेरी

July 16, 2011 5:03 PM0 commentsViews: 1

16 जुलै

झी सारेगमपच्या नवीन पर्वात यावेळी स्पेशल गेस्ट म्हणून दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगणने हजेरी लावली. निमित्त होतं सिंघम या आगामी सिनेमाच्या प्रमोशनचं. सोरगमपचे जज अजय-अतुल या जोडीनं सिंघमला संगीत दिलं. त्यामुळे सारेगमपचा यावेळचा भाग जास्तच रंगला होता.

सिंघम सिनेमातला बाजीराव अर्थात अजय देवगण आणि सिनेमाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीनं मराठमोळ्या स्टाईलने स्टेजवर एन्ट्री केली. अजय-अतुलने सिनेमाचे टायटल साँग सादर करून सारेगमपच्या दुनियेत या दोन्ही पाहुण्यांच स्वागत केलं. या सिंघममय माहौलमध्ये सगळ्या स्पर्धकांनी अजय देवगणवर चित्रित करण्यात आलेली गाणी यावेळेस सादर केली.

सिंघममध्ये अजय देवगणने मराठमोळा बाजीराव सिंघम साकारला. या मराठमोळ्या व्यक्तिरेखेबरोबरच या सिनेमात एकूण 15 मराठी कलाकार काम करत आहे. यातच सारेगमपचा मराठमोळा माहोल पाहून रोहित शेट्टीही मराठीमय झाला नसेल तर नवल. अजय आणि रोहितच्या उपस्थितीमुळे स्पर्धक खूश होतेच पण या स्पर्धकांबरोबरोबर सेलिब्रिटी जज यांनीही आपला आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाचा शेवट अजय देवगणच्या कोंबडी पळाली या आवडत्या मराठी गाण्याने झाला. या सगळ्या घडामोडींमध्ये वरचढ ठरला तो अजय देवगणने साकारलेला मराठमोळा बाजीराव.

close