सिस्टिमला जबाबदार धरणारे कामत यांचा घुमजाव

July 17, 2011 11:31 AM0 commentsViews: 7

17 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाला सिस्टिमच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत यांनी काल केला होता. तसेच मुंबईत या आधी घडलेल्या घटनांपासून आपण काहीही धडा घेतलेला नाही त्यामुळे बाँबस्फोटासारख्या घटना वारंवार घडतात अशी टीका ही कामत यांनी केली होती. दरम्यान आज कामत यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा केला. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिलं.

कामत यांचे स्पष्टीकरण

"मी कुणालाही टार्गेट केलेलं नाही. पण मुंबईच्या सुरक्षेतील त्रुटी उघड करणे माझं कर्तव्य आहे ते मी केलं. यात कोणीही दोषी असले तरी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. 13 जुलैला बॉम्बस्फोट झाल्यानंतर अर्ध्या तासातच मी पंतप्रधान आणि सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं.

26/11 च्या हल्ल्यानंतर झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी मी या पत्रामध्ये केली. मुंबईचा प्रतिनिधी या नात्याने मी हे पत्र लिहिले. तसेच वेगवेगळ्या समित्यांचे अहवाल सरकारने स्वीकारले तरी त्यावर कारवाई झालेली नाही. ती तातडीने करावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं. पण मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी मी कोणतंही विधान केलेलं नाही."

close