सरकारचे लोकपाल विधेयक तकलादू – अण्णा हजारे

July 18, 2011 1:36 PM0 commentsViews: 69

18 जुलै

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आणखी एक पत्र लिहले आहे. या पत्रात अण्णांनी अनेक घोटाळ्यांचा उल्लेख केला आहे. तसेच लोकपाल संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकांमधून काय निष्पन झालं आहे असा सवाल ही अण्णांनी विचारला आहे.सरकारने जे लोकपाल विधेयक बनवलं आहे ते तकलादू आहे अशी टीका ही अण्णांनी केली. दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकपाल समितीच्या झालेल्या सर्व बैठकीनंतर अण्णा हजारे आणि सरकारमध्ये तिढा आणखी वाढला. परिणामी अण्णांनी पुन्हा 16 ऑगस्टपासून उपोषण करणार असा निर्धार केला. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांना एक पत्र लिहून अण्णांनी आपण उपोषणावर ठाम आहे असं ठणकावून सांगितले. सरकारने जे लोकपाल विधेयक बनवले आहे ते तकलादू आहे त्यात त्रुटी आहे. 15 ऑगस्टला संसदेत विधेयक जर मांडले नाही तर 16 ऑगस्टपासून आपण बेमुदत उपोषण करणार आहे असं अण्णांनी सांगितले.

दरम्यान आज अण्णांनी आंदोलन दडपले जावू नये यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. बाबा रामदेव यांचं आदोलन दडपले तसेच ऑगस्टमधील आंदोलन दडपल्यास कोर्टाने हस्तक्षेप करावा अशी विनंतीही न्यायालयाला करणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केलं. बाबा रामदेव यांच्यासारखीच तुमची स्थिती करू अशी धमकी काँग्रेसच्या काही नेत्यांनी अण्णांना दिली होती. त्यामुळेच ही खबरदारी घेणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असल्याचंही त्यांनी सांगितले.

close