समुद्रकिनारे अजूनही असुरक्षित !

July 19, 2011 4:25 PM0 commentsViews: 17

रोहिणी गोसावी आणि दिलीप केळुसकर, मुंबई

19 जुलै

13 जुलैच्या मुंबई झालेल्या हल्ल्यानंतरही महाराष्ट्रातील समुद्रकिनारे अजूनही असुरक्षितच आहेत. मुंबईत अजूनही अतिरेकी समुद्रमार्गातून घुसखोरी करू शकतात अशी परिस्थिती आहे. सागरी पोलीस दलातल्या अनेक जागा रिकाम्या आहेत. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रं नाहीत. कोकणची किनारपट्टी संवेदनशील समजली जाते.

तिथं गस्तीसाठी स्पीड बोटी देण्यात आल्या होत्या. पण त्या चालवण्यासाठी कर्मचारीच नसल्याने त्या धूळ खात पडल्या आहेत. समुद्रकिनार्‍यांवरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सर्च टॉवर्स नाहीत. दुसरीकडे, सागरी सुरक्षेसाठी मिळणारा निधी पूर्णपणे खर्च केला जात नाही.

मुंबईवर 26/11 चा हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवादी सागरी मार्गातूनच आले होते. त्यानंतर किनारपट्टी सुरक्षित करण्याची घोषणा सरकारने केली होती. राम प्रधान समितीनंही कोस्टल सिक्युरिटीसाठी उपाययोजना सुचवल्या होत्या. पण या शिफारसी धूळ खात पडल्याचं दिसून येतं.थंडी ऊन आणि पावसात बंद पडलेल्या बोटीत पोलिसांना जागता पहारा द्यावा लागतोय. ठाण्याच्या नागला बंदर परिसरापासून ते थेट डहाणू पर्यंत 100 किमी सागरी किनार्‍याच्या सुरक्षेची ही अवस्था आहे. सध्या 100 किमी किनार्‍यावर गस्त घालण्यासाठी इनमीन आठ स्पीड बोटी आहेत. पण एका वेळी एकच बोट गस्तीला जाते तीही एकच तास कारण बोट चालवायला जास्त खर्च आहे, एका बोटीला एका दिवसाला 20 ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो. असं ठाणे एसपी राजेशकुमार मोरे सांगतात.

एकीकडे सरकार सुरक्षेसाठी पैसे नाही म्हणून बोंबा मारतंय, तर दुसरीकडे आयबीएन लोकमतच्या हाती मिळलेल्या माहितीच्या अधिकारातील तपशीलामुळे गृह खात्याचा भोंगळ कारभार समोर आला. 2009 -10 मध्ये गृहखात्यातून पोलीस दलाला मिळालेल्या निधीतून तब्बल 133 कोटी रुपये न वापरल्यामुळे परत गेले. याबाबत स्थानिक आमदारांनसुध्दा विधानसभेत आवाज उठवला.

सध्या पावसाळा सुरु आहे म्हणून तीन महिने या परिसरात असलेला जागता पहारासुध्दा बंद ठेवण्यात आला. 1993 ला आरडीएक्स उतरलेलं नागला बंदर. जवळपास 58 आरडीएक्सच्या बॅग्ज या बंदरात उतरवता आलं कारण इथं ना कुठली गस्त होती ना कुठली सुरक्षा, एवढ्या मोठ्या घटनेनंतरही पोलीस आणि सरकारकडुन हे बंदर असूनही दुर्लक्षितच राहिलं.

नागला बंदरातून मंुबईत पोहोचायला 20 मिनीट लागतात आणि आपल्या पोलिसांना हत्यारे मिळायला लागेल तब्बल एक तास. मुंबईत शिरण्यासाठी या सगळ्या गोष्टी अतिरेक्यांच्या पथ्यावर पडणार्‍या आहेत.

ठाण्याच्या 112 किमी समुद्रकिनार्‍याची सुरक्षा अवलंबून आहे केवळ 16 पोलीस आणि आठ स्पीड बोटींवर ठाण्याच्या समुद्र किनार्‍यावर जवळपास 33 लँडींग पॉईंट आहेत, आणि फक्त 15 चेकपोस्ट तसेच 16 जेटी आहेत त्यात 11 जेटी सरकारच्या तर पाच जेटी खाजगी आहेत. ठाणे जिल्ह्यात फक्त एक सागरी पोलीस स्टेशन आहे. सागरी आयुक्तालय आणि आणखी तीन सागरी पोलीस स्टेशनचा प्रस्ताव अजुनही सरकारदरबारी मंजुर झाला नाही.

नागला बंदरसारख्या भुतकाळात झालेल्या घटनांमधून आपण काही धडा घेणार की पुन्हा एकदा एखाद्या देशविघातक कारवाईसाठी असं रान मोकळं सोडणार ?

close