अजितदादांच्या आवाहनानंतरही कार्यकर्त्यांची ‘दादागिरी’ !

July 19, 2011 4:49 PM0 commentsViews: 23

अद्वैत मेहता, पुणे

19 जुलै

13 जुलै रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे येत्या 22 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. पण राष्ट्रवादीच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना काही ते पचनी पडलेलं दिसत नाही.

पुण्यातील नगरसेवक तसेच विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांनी 21 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचा घाट घातला आहे. या इव्हेंटची माहिती देणारी हजारो बॅनर्स पुण्याच्या रस्त्यारस्त्यांवर लावली आहे. प्रत्येक रक्तदात्याला 4 जीबीचा पेनड्राईव्ह ही भेट देण्यात येणार आहे. तसेच या शिबिराला सलमान खानलाही आमंत्रित केलं गेलं आहे.

पुण्यात अजितदादांचा 22 जुलै रोजी येणारा वाढदिवस म्हणजे काही कार्यकर्त्यांसाठी शहरभर फ्लेक्स, बॅनर्स लावून दादांच्या छबीसोबत आपली छबी झळकावून चमकण्याचा दिवस. मग भले अजितदादांनी शुभेच्छांचे बॅनर्स- फ्लेक्स लावून शहाराचे सौंदर्य बिघडवू नका असं सांगितले तरी ऐकतील ते कारयकर्ते कसले.

पण यंदा मुंबईत बॉम्बस्फोट झाला आणि खुद्द दादांनीच वाढदिवसानिमित्त कसलेही कार्यक्रम साजरे करू नका असं फर्मान काढलं. पण काही दिवसांआधीच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्प केलेल्या आमदार अनिल भोसले यांनी शक्कल लढवत मुंबईतील बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना हे शिबिर समर्पित करत भावनिक झालर दिली. बॉम्बस्फोटाची दु:खद घटना आणि वाढदिवसाची आनंददायी घटना याचा मेळ त्यांनी घातला.

शहरभर लावलेल्या हजारो बॅनर्सवर अजितदादांसोबत अनिल भोसलेंचीही छबी झळकतेय शिवाय रक्तदात्यांना 4 जीबीचा पेनड्राईव्ह देण्याचे आमिषही. 21 जुलैला सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संभाजी बागेत आयोजित केल्या जाणार्‍या या शिबिरात 10 हजार लोक रक्तदान करतील असा अंदाज आहे.

रक्तदानाच्या क्षेत्रात काम करणार्‍या काही जणांचे सेलिब्रिटीना बोलावल्याशिवाय तसेच पेन ड्राईव्ह सारकी गिफ्ट दिल्याशिवाय रक्तदान कुणी करत नाही असा दावा आहे तर काहींचं मत असं भव्य शिबिरं म्हणजे शोबाजी असून शबीराच्या आडून स्वताचा प्रचार करण्याचा प्रकार आहे.

अनिल भोसलेंनी रक्तदान शिबीर जरूर भरवावीत पण ऐच्छीक असलेल्या रक्तादानाचा मेगा इव्हेंट बनवून ते खर्चिक करू नये. असं झाल्यास एक वाईट पायंडा पडेल अशी भीती व्यक्त केली जातीय हे अनिल भोसलेंनी लक्षात घ्यावे एवढीच जाणकारांची अपेक्षा आहे.

close