मीडियासम्राट रुपर्ट मरडॉक यांची झाडाझडती

July 19, 2011 5:48 PM0 commentsViews: 6

19 जुलै

जगभरातल्या मीडियाचा बादशाह. रूपर्ट मरडॉक यांची आज ब्रिटीश संसदेने झाडाझडती घेतली. मरडॉक यांच्या मालकीच्या न्यूज ऑफ द वर्ल्ड या वृत्तपत्राने अवैध पद्धतीने हजारो लोकांचे फोन टॅप केले होते. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर ब्रिटनमध्ये वादळ निर्माण झालं.

हे फोन टॅपिंग प्रकरण ज्या पत्रकारानं बाहेर काढलं. त्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे मरडॉक यांच्याभोवतीचं गूढ वाढत गेलं. आणि पत्रकारितेच्या अनैतिक बाजारीकरणावरही चर्चा सुरू झाली आहे.

रूपर्ट मरडॉक.. जगभरातल्या मीडियाचे अनभिषिक्त सम्राट. पण अखेरीस त्यांना ब्रिटीश संसदेसमोर झुकावं लागलं. न्यूज ऑफ द वर्ल्ड या वृत्तपत्राने केलेल्या अवैध आणि अनैतिक कृत्यांबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. पण माझ्याच कर्मचार्‍यांनी माझी दिशाभूल केली असा दावाही त्यांनी केला.

1843 साली सुरू झालेलं न्यूज ऑफ द वर्ल्ड हे वृत्तपत्र 1969 साली मरडॉक यांनी विकत घेतलं. सनसनाटी, मसालेवाईक बातम्या देऊन त्यांनी या पेपरचा खप प्रचंड वाढवला. त्यांनी शेकडो गुप्तहेरांना नोकरीवर ठेवून घेतलं.

अनेक नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या आणि राजघराण्यातल्या मंडळींच्या खासगी आयुष्यावर 24 तास नजर ठेवालया सुरवात केली. हा प्रकार उघड झाल्यावर मरडॉक यांना हा सर्वाधिक खपाचा पेपर बंद करावा लागला. पण तरीही हे वादळ शमलं नाही. आणि खुद्द पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांना हस्तक्षेप करावा लागला.

मरडॉक – मीडिया साम्राज्य

- द सन, द वॉल स्ट्रीट जर्नल, द टाइम्स, न्यू यॉर्क पोस्ट सारखे डझनावारी वृत्तपत्रं- फॉक्स, स्काय, नॅश्नल जिऑग्रफिक, स्टार इंडिया सारखे अनेक टी व्ही चॅनल्स- 20 व्या सेंच्युरी फॉक्स ही सिनेनिर्मिती करणारी सुप्रसिद्ध कंपनी- युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया खंडांत 7.5 अब्ज डॉलर्सचं मीडिया साम्राज्य

न्यूज ऑफ द वर्ल्डमधील गैरव्यवहार बाहेर काढणारा पत्रकार सिऍन होअर याचा सोमवारी रात्री संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढलं आहे. ज्या मरडॉक यांच्या साम्राज्यावर कधी सूर्यास्त होत नाही. त्या मरडॉक यांचाच सूर्यास्त जवळ आला असं आता त्यांचे विरोधक म्हणत आहे. ऐंशी वर्षांच्या रूपर्ट मरडॉक यांनी कधीच पराभव पाहिला नव्हता. पण न्यूज ऑफ द वर्ल्ड प्रकरणामुळे. त्यांना सॉरी ही म्हणावं लागलं. आणि गुड बाय ही करावं लागलं.

close