कोल्हापुरात पाऊस ओसरला ; धरणांच्या पातळीचा धोका कायम

July 20, 2011 1:16 PM0 commentsViews: 8

20 जुलै

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह इतर नद्याच्या पाणी पातळीत वाढच होत आहे. त्यामुळे पुराचा धोका कायम आहे. काळम्मावाडी धरण 85 टक्के भरलं असून जलाशयाची पातळी नियंत्रित करण्यासाठी पाच दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून 7000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

तर दुसरीकडे राधानगरी धरण 95 टक्के भरले असून पॉवर हॉऊसमधून 2000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरण जवळपास पूर्ण क्षमतेनं भरलं असल्यामुळे धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नद्याच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधार्‍यावरची पातळी 40 फुट 10 इंच इतकी आहे. पंचगंगेची वाटचाल धोकापातळीकडे सुरु आहे. पंचगंगेची धोका पातळी 43 फूट इतकी असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील 44 गावांतील 67 घरांची अशंता पडझड झाली आहे. अजूनही 73 बंधारे पाण्याखाली असून पर्यायी मार्गाने वाहतुक सुरु आहे.

close