एटीएसच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे !

July 20, 2011 2:08 PM0 commentsViews: 4

20 जुलै

मुंबईत झालेल्या13 जुलैला साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा दावा एटीएसने केला आहे. याप्रकरणी काढण्यात आलेल्या रेखाचित्रावरून महत्त्वाची माहिती हाती लागल्याचं एटीएसनं सांगितले आहे. रेखाचित्र काढलेला संशयित मध्य किंवा उत्तर भारतातून आला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

त्यामुळेच महाराष्ट्राबाहेर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तपासपथकं पाठवण्यात आल्याचे एटीएसने स्पष्ट केले. रेखाचित्रातला हा संशयिताचा झवेरी बाजारमधील बॉम्बस्फोटात सहभाग असावा असा त्यांचा अंदाज आहे. संशयिताचे रेखाचित्र मीडियाला दिलेलं नाही. ते फक्त मोजक्या तपास अधिकार्‍यांकडे पाठवण्यात आले आहेत.

तसेच एटीएसने आतापर्यंत तब्बल एक लाखापेक्षा जास्त फोन कॉल्सचे स्कॅनिंग केलं आहे. शिवाय आणखी काही फोन कॉल्सचे स्कॅनिंग सुरू असल्याचे एटीएसने स्पष्ट केले.

मुंबईत झालेल्या तिहेरी स्फोटाचे नेपाळ आणि आखाती कनेक्शन असल्याचे तपासात उघड झालं. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटांच्या ठिकाणावरून 13 जुलैच्या आधी आणि नंतर काही मोजक्या फोन नंबरवरुन नेपाळसह इतर देशांमध्ये शेकडो कॉल्स केले गेले. त्यामुळे तपास यंत्रणांनी आता आपला तपास या फोन कॉल्सच्या दिशेनं वळवला.

मुंबई स्फोटांचे इंटरनॅशनल कनेक्शन

- स्फोटाआधी केलेल्या 80 इंटरनॅशनल कॉल्सचा तपास सुरु- नेपाळ आणि आखाती देशांमध्ये केले गेले कॉल्स- नेपाळमधील विराटनगर आणि दानिया हे भाग केंद्रस्थानी- नवीन अतिरेक्यांची भरती करुन घडवले स्फोट

देशात झालेल्या बॉम्ब स्फोटांमागे आणि दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान कनेक्शन नसेलचं तर नवल. मंुबईत झवेरी बाझार, ओपेरा हाऊस आणि दादर इथं झालेल्या तिहेरी बॉम्ब स्फोटाचे पाकिस्तान कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात समोर आलं. बॉम्ब स्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणांनी ताबडतोब घटना स्थळा जवळील आणि घटना स्थळावरुन केलेल्या फोन कॉल्सची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

या तिन्ही ठिकाणावरुन बॉम्ब स्फोटाच्या आधी आणि नंतर 432 नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉल्स केले गेलेत. त्यापैकी 132 फोन कॉल्स ज्या तिन ठिकाणी बॉम्ब स्फोट झाले त्या ठिकाणांवरुन स्फोटाच्या आधी करण्यात आलेत. तर या 132 पैकी 80 फोन कॉल्स हे आंतरराष्ट्रीय फोन नंबरवर करण्यात आलेत.

यामध्ये सर्वात जास्त कॉल्स हे नेपाळ, पाकिस्तान आणि अरब देशामध्ये करण्यात आलेत. पाकिस्तानातून नेपाळ बॉर्डरवरील विराटनगर आणि दानिया या गावात फोन कॉल्स केले गेले. या दोन्ही ठिकाणी दहशतवादाचे ट्रेनिंग दिलं जातं असा गुप्तचर यंत्रणेनं अहवालात सांगितलं होतं.

स्फोटामागे पाकिस्तान कनेक्शन असल्याचे तपासात समोर आलं. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या फोन कॉल्सवरुन बॉम्ब ठेवणारे हे नवखे होते. त्यामुळेच मंुबई तिहेरी बॉम्ब स्फोटासाठी नवीन स्लीपर सेलचा वापर केला गेला या निष्कर्षा पर्यंत तपास यंत्रणां पोहोचल्यात.

देशात आतापर्यंत झालेल्या बॉम्ब स्फोटावरुन एक गोष्ट प्रकर्षानं समोर आली. ती म्हणजे बॉम्ब स्फोटासाठी नवीन युवकांची भरती केली जाते. नवीन स्लीपर सेल तयार केला जातो. मंुबई तिहेरी बॉम्बस्फोटासाठी आंध्रपद्रेश, आझमगढ आणि अहमदाबाद मॉड्युलचा स्लीपर सेलचा वापर केला गेला होता. असा पोलिसांना संशय आहे.

close