मनसे आमदारांना बैठकीतून बाहेर काढले

July 21, 2011 2:51 PM0 commentsViews: 4

21 जुलै

गिरणी कामगारांच्या लढ्यात सहभागी मनसेला आज चांगलाच फटका बसला. गिरणी कामगारांसोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या मनसेच्या दोन आमदारांना बैठकीत बसू देण्यास नकार देण्यात आला. बाळ नांदगावकर आणि नितिन सरदेसाई हे या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते.मात्र बैठक सुरू होण्याच्या काही वेळ आधी या दोन्ही आमदारांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगण्यात आले अशी माहिती नितिन सरदसाई यांनी दिली.

मात्र मनसे आमदारांना बैठकीतून बाहेर काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारले असता ही बैठक फक्त कामगार संघटनांसाठी होती त्यामुळे फक्त गिरणी कामगारांच्या प्रतिनिधींनाच आपण भेटलो असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टिकरण दिलं. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर मुंबईतील आमदारांना आपण नंतर स्वतंत्रपणे भेटणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.

मनसे आमदारांना बाहेर काढल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी कामगार संघटनेचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट मागत होते तेव्हा ते देत नव्हते. यानंतर बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी विचारपूस केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी फोन करून आज तीन वाजेची वेळ दिली. आणि जेव्हा संघटनेची नेते भेटण्यास गेले असता आमदारांना बसण्यास नकार का दिला. जर असं असतं तर कामगार संघटनेच्या नेत्यांना अगोदर का बोलावले नाही. असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 22 वर्षापासून लढा सुरू आहे. कामगारांसाठी बांधलेली घर देत नाही ही कोणती चांगली गोष्ट आहे. येईल आमची ही वेळ येईल. असंही राज म्हणाले.

close