आघाडीत ‘गृह’ कलह

July 21, 2011 5:46 PM0 commentsViews: 9

विनोद तळेकर, अमेय तिरोडकरसह आशिष जाधव, मुंबई

21 जुलै

गृहविभागाच्या कारभारावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सध्या वाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहविभागाच्या कारभारात हस्तक्षेप केल्याने राष्ट्रवादीचे नेते डिवचले गेले. त्याचा परिणाम म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिसले. दोन्ही काँग्रेसचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले.

त्यामुळे आघाडी सरकारमधील पेच वाढला आहे. आघाडीच्या या राजकारणात जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय, असा आरोप शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. आणि सरकारच बरखास्त करण्याची मागणी केली.

आधी सीसीटीव्ही नंतर बुलेटप्रुफ जॅकेटची खरेदी. या गृहखात्याच्या प्रस्तावांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच गुन्हे शाखेच्या कंट्रोल रूमची पाहणीही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासोबत केली.

13 जुलैच्या बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याची कमान एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी आपल्या हाती घेतलीये. त्यामुळे सहाजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्याचे पडसादही उमटले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. या मंत्रिमंडळातल्या वादाला उपमुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला. एवढचं नाही तर मुख्यमंत्र्यांच्या सर्वाधिकारालाही छेद देणारे वक्तव्य केलं.

आघाडी सरकारमध्ये सध्या कमालीचे मतभेद निर्माण आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही काँग्रेसचे नेते करत आहेत. आघाडीच्या राजकारणात सरकारच्या कामकाजाकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेनं केली.

आघाडी सरकारमध्ये भांडणं लागली असतानाच येत्या सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे विरोधकांना सरकारला कोंडीत पकडण्याची आयती संधी चालून आली.

close