अमर सिंह यांची झाडाझडती

July 22, 2011 5:04 PM0 commentsViews: 8

22 जुलै, दिल्ली

कॅश फॉर व्होट्स प्रकरणाच्या तपासाला आता 3 वर्षांनंतर वेग आलाय. समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांची दिल्ली पोलिसांनी तीन तास चौकशी केली. अमर सिंह यांनी त्यावेळी काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचं कबूल केलं. पण खासदारांना पैसे दिल्याचे आरोप मात्र फेटाळले. येत्या आठवड्यात भाजप खासदार अशोक अरगल आणि लालकृष्ण अडवाणींचे माजी सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

22 जुलै 2008 साली भाजपच्या तीन खासदारांनी कोट्यवधी रुपयांची बंडलं लोकसभेत दाखवून एकच खळबळ माजवली. डाव्या पक्षांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर झालेल्या या विश्वासदर्शक ठरावाआधी युपीए सरकारने अमर सिंहांमार्फत आमची मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप या भाजप खासदारांनी केला. पण 3 वर्षं याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही.

तीन वर्षांनंतर आज 22 जुलैला सुप्रीम कोर्टानं बडगा उगारल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अमर सिंह यांना चौकशीसाठी बोलवलं. संजीव सक्सेना आणि सोहेल हिंदुस्तानी नावाच्या दोन व्यक्तींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दोघांनी अमर सिंह हेच यात मास्टरमाइंड असल्याचं म्हटलंय. पण तीन तास चाललेल्या चौकशीत अमर सिंह यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला. याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असा त्यांनी दावा केला.

पोलीस: सोहेल हिंदुस्तानी या मध्यस्थानं भाजपच्या खासदारांना समाजवादी पक्षापर्यंत आणलं. तुम्ही त्याला कधी भेटला आहात का?अमर सिंह : मी सोहेल हिंदुस्तानीला कधीही भेटलो नाही.

पोलीस: संजीव सक्सेना नावाच्या व्यक्तीने भाजप खासदारांना रक्कम दिली. ही रक्कम सक्सेनाला तुम्ही दिली होती का?अमर सिंह : सक्सेना माझ्यासाठी आधी काम करायचा. पण जेव्हा हे प्रकरण घडलं, तेव्हा तो माझ्याकडे नोकरी करत नव्हता. मी त्याला रक्कम दिली नाही.

पोलीस: विश्वासदर्शक ठरावाच्या दरम्यान तुम्ही काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होता का?अमर सिंह : हो. त्यावेळी आम्ही काँग्रेसचे मित्रपक्ष होतो. तसंच, माझे सर्व पक्षांत मित्र आहेत.

अमर सिंह यांनी हे पैसे दिले नाहीत, तर सक्सेनाकडे रातोरात एक कोटी रुपयांची रक्कम कुठून आली? आणि मुळात या पूर्ण व्यवहाराला सुरवात कुणी केली? भाजपच्या खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत होतं.. की काँग्रेसला अडकवण्यासाठी भाजप सापळा रचत होतं? काँग्रेस या सर्व प्रश्नांवर बोलत नसलं तरी भाजपनं या प्रकरणासाठी थेट पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग जबाबदार धरलंय.

अमर सिंग यांनी आरोपांचा इन्कार केला असला, तरी पोलिसांकडे त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत. म्हणून त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलवण्यात येणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते रेवती रमण सिंग, भाजप खासदार अशोक अरगल आणि लालकृष्ण अडवाणींचे तत्कालीन सल्लागार सुधींद्र कुलकर्णी यांचीही चौकशी येत्या आठवड्यात होणार आहे.

close