येडियुरप्पांची आता पक्षांतर्गत विरोधाची इनिंग

July 24, 2011 11:59 AM0 commentsViews: 2

24 जुलै

काँग्रेसकडून वारंवार हल्ले सहन करणार्‍या येडियुरप्पांना आता पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागणार आहे. लोकायुक्तांनी दिलेल्या अहवालावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वाकडे केली. त्यामुळे सध्या परदेशात सुट्टी एन्जॉय करणार्‍या येडियुरप्पांना भारतात परतल्यावर बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागणार असं दिसतं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन येडियुरप्पांना हटवा अशी थेट मागणी आता भाजपमधूनच होऊ लागली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष शांताकुमार यांनी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांना पत्र लिहून येडियुरप्पांना हटवण्याची मागणी केली.

कर्नाटकात लोकायुक्तांनी मुख्यमंत्र्यांबद्दल दिलेल्या अहवालावर भाजपने कारवाईचे संकेत दिले. कारण येडियुरप्पांवर कारवाई झाली नाही तर भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातली हवाच निघून जाईल. तरीही या मुद्द्यावर भाजप अजूनही सारवासारव करण्याच्याच प्रयत्नात आहे.

सर्व बाजूने टीका होतेय तरी येडियुरप्पा मात्र मॉरिशसमध्ये सुट्टीची मजा घेत आहेत. सोमवारी पहाटे ते बंगळुरूला पोहचतील. त्यांच्यावर राजीनाम्या करता दबाव वाढलाच तर ते थोडी ताठर भूमिका घेतील. आणि त्यांची विश्वासू सहकारी शोभा करंदलाजेला मुख्यमंत्रीपद देण्याकरता पक्षाला गळ घालण्याची शक्यता आहे.

मात्र सध्या तरी येडियुरप्पांचे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचेही विरोधक गळ टाकून बसले आहे. भाजपचे दक्षिणेतील हे पहिलचं सरकार. त्यातच येडियुरप्पांचा ताठा कायम राहिला तर हे सरकार बरखास्त करुन मध्यावधी निवडणुका घेण्याशिवाय भाजपकडे पर्याय नसणार आहे. यामुळेच भाजप पक्षश्रेष्ठींमध्ये अस्वस्थता आहे.

तर दुसरीकडे कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी अवैध खाणकामाविरूध्द दिलेला अहवाल योग्यच आहे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं. हेगडे हे अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहेत. देशहित त्यांच्यासाठी सर्वोच्च असून ते चुकीचा अहवाल देणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काँग्रेस पक्ष गळ टाकून बसलाच आहे. काँग्रेस नेते कर्नाटकचे राज्यपाल एच आर भारद्वाज यांची भेट घेऊन येडियुरप्पांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत. खाण घोटाळ्याप्रकरणी लोकायुक्तांचा अहवाल येईल त्याप्रमाणे कारवाई करणार असल्याचे राज्यपाल भारद्वाज यांनी सांगितलं आहे. हा अहवाल अजून सरकारकडे सादर करण्यात आलेला नाही.

close