गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच खुलेआम मटक्याचा धंदा

July 25, 2011 10:04 AM0 commentsViews: 46

25 जुलै

अनेकांचे संसार उद्धवस्त करणार्‍या मटक्यावर कायद्याने बंदी आहे. कायदेशीररित्या मटका बंद असला तरी मटक्याचा हा धंदा सध्या राज्यातील अनेक ठिकाणी जोरात सुरु आहे. या मटक्याच्या खुल्या बाजाराचे वास्तव खुद्द गृहराज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात राजरोसपणे सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील देवरवाडी या ठिकाणी खुलेआमपणे हा जुगार सुरु आहे. चंदगड तालुका हा सीमा भाग असल्याने याठिकाणी कर्नाटक आणि गोवा या राज्यातील लोक या जुगार खेळण्यासाठी येत असतात. खचाखच भरलेला हा जुगाराचा अड्डा गेल्या 25 वर्षांपासून राजरोसपणे सुरु आहे.

गेल्या पंचवीस वर्षांत जुगाराच्या या अड्‌ड्यावर पंधरा वर्षांपूर्वी एकदा धाड पडली होती. तेव्हापासून हा अड्डा चोवीस तास सुरु असतो. या ठिकाणी कल्याण, मुंबई नावाच्या मटक्यासह कॅसिनो आणि पत्यांचा अंदर बाहर डाव अगदी बिनदिक्कतपणे सुरु असतो.

हा जो जुगाराचा अड्डा आहे तो काही साधासुधा नाही. त्या ठिकाणी सुरु असलेली उलाढाल पाहिल्यास कोणाचेही डोळे दिपतील.

- महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर चालतो हा अड्डा – दररोज होते 1 कोटीची उलाढाल- 50 जणांची टोळी चालवते हा जुगाराचा अड्डा- गेली 25 वर्षं राजरोस सुरू आहे जुगार आणि मटका- पोलिसांना हप्ते मिळत असल्याचा आरोप- दोन्ही राज्यांतील मोठे व्यापारीही येतात जुगार खेळायला

मटक्याचा हा धंदा ज्या कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री त्याच जिल्ह्यातील आहेत. काही महिन्यांपूर्वी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आदेश दिला होता की, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका सुरु असेल त्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी.

पण हा सगळा प्रकार त्यांच्याच जिल्ह्यात सुरु आहे आणि तोही अगदी बिनदिक्कतपणे. तेव्हा हा एवढा मोठा जुगाराचा अड्डा त्यांच्या नाकासमोर सुरु असताना आता गृहराज्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. या जुगाराच्या अड्‌ड्याला थारा देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई होणार का ? जुगाराचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्याऐवजी त्यांच्याकडून हप्ते घेऊन त्याना संरक्षण देण्यात पोलीस मश्गुल आहेत असा आरोप केला जात आहेत.

त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करतात. हा जुगाराचा अड्डा उद्धवस्त करतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close