अण्णांना जंतरमंतरवर परवानगी नाकारली

July 29, 2011 12:41 PM0 commentsViews: 2

29 जुलै

अण्णा हजारेंनी लोकपालच्या मुद्द्यावरून दुसर्‍या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सरकार आता हे आंदोलन चिरडण्यासाठी सरसावलं. हे आंदोलन होऊच नये यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत. जंतर मंतरमध्ये जमावबंदी लागू करून अण्णांना आंदोलनासाठी परवानगी नाकारली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीपासून दूर असलेल्या बुराडी आणि अजमल खान पार्कसारख्या पर्यायी जागा पोलिसांनी सुचवल्या आहेत. मोठ्या आत्मविश्वासाने लोकपाल विधेयकाचा सराकरी मसुदा मंजूर केल्यानंतर आता केंद्र सरकारला चिंतेनं ग्रासलंय. आणि म्हणूनच सरकार पुन्हा पोलिसांची मदत घेतंय. दिल्लीचे पोलिस आयुक्त गृहमंत्री पी चिदंबरम यांना भेटले. आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चर्चेनंतर. आता अण्णा हजारे यांना जंतर मंतर इथं उपोषण करायची परवानगी नाकारली जाऊ शकते. सरकारच्या वतीने इतर जागा सुचवण्यात आल्या असल्या तरी नागरी समितीने सरकारचं खंडन केलं. गेल्या वेळी अण्णांनी जंतर मंतर इथं केलेल्या आंदोलनाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. अशा सरकारविरोधी आंदोलनाची पुनरावृत्ती सरकारला नकोय. अण्णांच्या आंदोलनामुळे युपीए सरकारचा भ्रष्टाचार ऐरणीवर आला.

तर बाबा रामदेवांचे आंदोलन चिरडल्यामुळे सरकारवर जोरदार टीका झाली. हे सर्व टाळण्यासाठी सरकारने ठरवलंय की अण्णांना जंतर मंतरपर्यंत पोचूच द्यायचे नाही. ही जागा खूप लहान आहे आणि आमरण उपोषण म्हणजे आत्महत्या असते असली कारणं सरकारकडून दिली जात आहे.

सरकारच्या या निर्णयाविरुद्ध कोर्टात जायचा विचार अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी करत आहेत. त्यामुळे 16 ऑगस्टच्या आंदोलनाआधीच सरकार आणि नागरी समितीमध्ये संघर्षाला सुरवात झाली आहे.

close