‘रा वन’च्या टीममध्ये खटके

July 29, 2011 2:04 PM0 commentsViews: 6

29 जुलै

बॉलीवूडचा सध्याचा सर्वात महागडा सिनेमा म्हणजे रा वन. शाहरुखचीच निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या बाबतीत सध्या तरी काहीच चांगलं घडताना दिसत नाही. उलट या सिनेमासमोरची संकटं मात्र जास्तीत जास्त वाढताना दिसत आहे.

तब्बल एका वर्षानंतर शाहरुखच्या रा वन सिनेमाचं शूट अखेर संपलं तर खरं पण यात सिनेमाचे बजेट तब्बल शंभर कोटींपेक्षा जास्त झालं. या सिनेमासंदर्भात बर्‍याच चर्चा सुरु आहेत यापैकीच एक म्हणजे शाहरुखने नुकतंच तरुण मनसुखानी यांना रा वनचं रामोजी फिल्म सिटीमध्ये एक शेड्युल दिग्दर्शित करण्यासाठी बोलवून घेतलं.

रा वन चा तरुण हा तिसरा दिग्दर्शक आहे. गेल्या वर्षी शाहरुखचा खास मित्र करण जोहरने लंडनमध्ये शाहरुख आणि करिनामधला रोमॅन्टिक सीन दिग्दर्शित केला. सध्या शाहरुख आणि अनुभव सिन्हा यांच्यात तणावाचे वातावरण तयार झालंय. या सिनेमासाठी खास हॉलीवूडमधून व्हिएफएक्‌स टीम बोलावून घेतली होती जिच्याबरोबर शाहरुखने स्वतः बसून सिनेमातील क्रिएटीव्ह कॉल्स घेतले पण त्याने दिग्दर्शक अनुभव सिन्हाशी कुठलीही चर्चा केली नाही.

या सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच मे मध्ये रिलीज झाला. ज्यात संजय दत्त आणि प्रियांका चोप्रा या दोन कलाकारांची ऍडिशनल नावं समाविष्ट केली गेलीत. हे दोघंही सुरुवातीला या सिनेमात नव्हते पण नंतर या दोघांना सिनेमात सहभागी केलं गेलं. याच सिनेमातील "छमक छल्लो" हे गाणं नुकतंच एका वेबसाईटवर लीक झालं.

अर्थात गाणं लीक होणं हेही सिनेमाच्या पब्लिसिटीच्या दृष्टीनं पाहिलं जातंय. असं म्हंटलं जातंय की आमीर आणि सलमानच्या बॉक्स ऑफिसवरील यशानंतर शाहरुखही मोठ्या हिटसाठी आतुर आहे. ज्याचं प्रचंड प्रेशरही त्याच्यावर आहे. मात्र येत्या दिवाळीत सिनेमा रिलीज झाल्यानंतरच शाहरुखचा रा 1हिट होतो की फ्लॉप हे कळेल.

close