येडियुरप्पांचे शक्तिप्रदर्शन ; मुख्यमंत्री मीच ठरवणार !

July 29, 2011 4:58 PM0 commentsViews: 1

29 जुलै

कर्नाटकात येडियुरप्पांचा राजकीय वारसदार कोण यावर अजून एकमत झालेलं नाही. येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यासाठी भाजप नेते राजनाथ सिंग आणि अरुण जेटली बंगळुरूमध्ये आहेत. पण, येडियुरप्पा आणि त्यांच्यातल्या चर्चेत काही तोडगा निघाला नाही. राजीनाम्याचे पत्र दिल्यानंतरही पक्षनेतृत्वावर दबाव आणण्याचा येडियुरप्पांचा प्रयत्न सुरू आहे.

आपल्याला 73 आमदार आणि 15 खासदारांचा पाठिंबा आहे असा दावा त्यांनी केला. 31 तारखेला आपण राजीनामा देणार असं येडियुरप्पा यांनी सांगितले. पण नवा मुख्यमंत्री आपल्याच मर्जीतला असावा अशी अट त्यांनी घातली. भाजप नेते सदानंद गौड यांचं नाव त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं.

ग्रामविकास मंत्री जगदीश शेट्टार किंवा ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांच्या नावाला येडियुरप्पांचा तीव्र विरोध आहे. चर्चेसाठी आणखी तीन ते चार दिवस हवेत अशी त्यांची मागणी आहे. कोंडी वाढल्याने पुन्हा येडियुरप्पांशी चर्चा करण्यापूर्वी केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय राजनाथ सिंग आणि अरुण जेटली यांनी घेतला.

दरम्यान, कर्नाटक भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आज होणार होती. पण ती आता उद्या घेण्यात येणार आहे. दुसरीकडे लोकायुक्तांच्या अहवालाला येडियुरप्पा हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे समजतंय.

close