मंदीचा फटका एफएमसीजी कंपन्यांना नाही

November 14, 2008 2:47 PM0 commentsViews: 14

14 नोव्हेंबर, हैदराबाद शेख अहमद अलीजागतिक मंदी आणि पैशांची कमतरता यामुळे धंदा बसल्याची ओरड सर्वच क्षेत्रांमध्ये होतेय पण रोजच्या वापरातल्या बारीक-सारीक गोष्टींच्या खपावर मात्र मंदीचा फारसा परिणाम दिसत नाही. उलट घरगुती वापराच्या अशा वस्तू बनवणार्‍या कंपन्याची विक्री शहरांखेरीज ग्रामीण भागातही वाढल्याचं दिसतंय.साबण, खोबरेल तेल, टूथपेस्ट, साखर, मीठ किंवा चहापावडर अशा कितीतरी वस्तू आहेत, ज्यांच्याशिवाय आपली वाण्याची यादी पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच हिंदुस्तान युनिलिव्ह, मॅरिको, डाबर,आयटीसी, गोदरेजसारख्या कित्येक कंपन्यांना मंदीची फारशी झळ पोहोचलेली नाही. कारण अशाच कंपन्यांच्या वस्तुंचा सर्वात जास्त खप आणि वापर असतो. ' हे एफएमसीजी सेक्टरचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना तोटा होतोय. तेव्हा आमचा खप कायम आहे ', गोदरेज ग्रुपचे अध्यक्ष आदी गोदरेज सांगत होते. या वर्षीचे एफएमसीजी कंपन्याचे दुसर्‍या तिमाहीतले रिझल्ट्सही एकूण उत्पन्न चांगलं आल्याचं दाखवतायत. विशेष म्हणजे, घरगुती वापराच्या वस्तू बनवणार्‍या या कंपन्याचं 30 ते 50 टक्के उत्पन्न छोट्या गावांमधून येतंय. ' गेली दोन वर्षं शहरांमधून जास्त उत्पन्न मिळत होतं, पण आता छोटी गावं आणि छोट्या शहरांमधूनही उत्पन्न वाढतंय आणि ते अजून वाढेल असंच वाटतंय ' , असं मॅरिकाच्या सीईओ सौगता गुप्ता यांनी सांगितलं. गावांमधून रोजच्या वापराच्या वस्तू जास्त खपतायत कारण यंदा पिकांमधून चांगलं उत्पन्न मिळाल्यामुळे लोकांच्या हातात पैसा खेळतोय. तसंच ग्रामीण भागात रोजगाराचंही प्रमाण वाढलंय. ' गेल्या वर्षात शहरांमधून नोकर्‍या निर्माण होण्याचं प्रमाण पाच टक्क्यांनी वाढलं त्यामुळे गावाकडल्या लोकांनाही नोकर्‍या मिळून त्यांचं उत्पन्न वाढलं आणि एफएमसीजी वस्तूंच्या खपात त्याचमुळे वाढ दिसतेय ' असं कन्झ्युमर मार्केट्सचे प्रोजेक्ट मॅनेजर सुदीप सिन्हा सांगत होते.शहरांमधून हल्ली मंदीचा परिणाम थोडाफार विक्रीवरही दिसतोय. अशावेळी ग्रामीण भागातच प्रसार अधिक करुन वितरण आणि विक्री वाढवण्याचा प्रयत्न आता एफएमसीजी कंपन्या करतायत. त्यासाठी काही कंपन्यांनी वस्तुंची लहान आकारातली पॅकेजेसही तयार केली आहेत.

close