कोट्यावधीचा घोटाळा करणारे डॉ.बोरोले फरार

August 2, 2011 6:16 PM0 commentsViews: 44

प्रशांत बाग, जळगाव02 ऑगस्ट

स्वाहाकारासाठी सहकाराचा वापर करणार्‍या पतसंस्थांमधील घोटाळ्यांनी राज्य हादरुन गेलं. आणि यातीलच एक प्रमुख घोटाळेबाज पतसंस्था म्हणजे जळगावची तापी सहकारी पतसंस्था. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे व्याही आणि जावयाची ही पतसंस्था आहे. डॉ.सुरेश बोरोले हे खडसेंचे व्याही आहेत. 52 कोटी 98 लाखाचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका असलेले डॉ.बोरोले आणि खडसेंचे जावई पंकज बोरोले हे गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना आत्तापर्यंत सापडलेच नाहीत.

जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात डॉ.सुरेश बोरोले आणि त्यांचा मुलगा पंकज बोरोले यांच्यासह 16 जणांविरुध्द 4 जानेवारीला गुन्हा दाखल झाला.आणि बोरोले पितापुत्रांनी स्थानिक कोर्टापासून ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी धावपळ केली. पण सुप्रीम कोर्टानंही त्यांना जामीन नाकारला. तेव्हापासून फरार असलेले बोरोले पिता-पुत्र आता पोलिसांना कुठेही सापडत नाही. या पितापुत्रांना खडसे वाचवतात असा ठेवीदार आरोप करत आहे.

याच सहकार खात्याचा आशिर्वाद बोरोलेंच्या तापी पतसंस्थेला नेहमीच मिळाला. ठेवी परत मिळत नसल्याने अनेक पीडित ठेवीदारांनी या कार्यालयाच्या वारंवार चकरा मारल्या. अनेकांची तर घरं उध्वस्त झाली. पण त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

याच डॉ.सुरेश बोरोलेंनी नाममात्र जामीनावर आपल्या नातेवाईकांच्या नावाने करोडो रुपयांची कर्ज 2007 साली तापी पतसंस्थेतून घेतली आहेत. कर्जदारांमध्ये भाऊ, पत्नी, भाचा यांचाच समावेश आहे. पण याच बोरोलेंना 25 जून 2008 ला विचारले तर त्यांनी त्याही वेळेस सफाईनं इन्कार केला होता.

डॉ.बोरोलेंना अटक करा या मागण्यांसाठी आता ठेवीदारांनी आंदोलन सुरु केले आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारल्याने बोरोलेंना अटक होणं हे निश्चित असलं तरी आता पोलिसांची भूमिका महत्वाची आहे. आपले पैसे मिळतील या वेड्या आशेवर जगणारी माणसं लढा देत आहेत. त्यांना न्याय मिळेल का हाच खरा प्रश्न आहे.

close