विद्युत प्रकल्पांमुळे शेतकर्‍यांच्या आयुष्याची ‘राख’रांगोळी !

August 2, 2011 6:04 PM0 commentsViews: 57

दीप्ती राऊत, नाशिक

02 ऑगस्ट

राज्याला वीज पुरवण्याचे काम औष्णिक विद्युत केंद्र करत आहेत. पण त्याबदल्यात या प्रकल्पाजवळच्या गावांना प्रदूषणाची मोठी किंमत चुकवावी लागत आहे. नााशिकच्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राची गत अशीच आहे. केंद्राभोवतालच्या गावातल्या शेतकर्‍यांची ना शेती पिकतेय, ना त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत आहे.

सामनगावच्या बहिरु डोळाणेंची 5 एकर जमीन एकलहरेच्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी सरकारने घेतली. पोट भरण्यासाठी 3 एकराचा तुकडा हातात राहिला. पण पॉवर प्लॅण्टमधून उडणार्‍या राखेनं त्याच्या शेतांची राखरांगोळी केली.

त्रस्त शेतकरी बहिरु डोळाणे म्हणतात, मी शेतात 1 एकर ऊस लावलेला होता. त्यासाठी 15 हजारांचं बेणं घेतलेलं. पण राखेमुळे ऊस कारखान्यानं तोडून नेला नाही. 15 हजार रुपयांचं कर्ज माझ्या बोकांडी पडलं आहे.

डोळाणेंसारखे 4 हजार शेतकरी एकलहरे केंद्राच्या राखेने हैराण झाले आहेत. एकेकाळी द्राक्षाच्या बागा फुलवणारी त्यांची शेती सध्या उजाड माळरान बनली आहेत. सामनगाव, कोटमगाव, एकलहरे आणि हिंगणगाव या चारही गावातल्या शेतकर्‍यांची ही अवस्था झाली आहे.आम्ही शेतकर्‍यांनी कुठे जायचं? काय करायचं? जमीन सोडूनही जाता येत नाही. असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे.

पॉवर प्लॅण्टची राख यांच्या पिकांवर बसते, शेतात पसरते, अगदी पाण्यातही मिसळते. याबद्दल त्रस्त शेतकरी किसन कापसे म्हणतात,ही राख पाण्यात मिसळली आहे यामुळे राखेच पाणी झालं आहे. यामुळे प्यायला पाणी नाही. मुक्या जनावरांनी हे पाणी पिल्यामुळे त्यांना रोग होऊन 2/3 जनावरं दगावली. जनावर ती जनावर पण यामुळे माणसंही आजारी पडतात.

एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रात राखेची विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नसल्याचे प्रदुषण नियंत्रण बोर्डानही मान्य केलं. त्याबद्दल 2006पासून सातत्याने बोर्डाने यांच्याशी पत्रव्यवहार केला. मात्र, केंद्राने त्याची कुठलीच दखल घेतली नाही. शेवटी बोर्डाने या केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावली आणि 1 कोटी रुपयांची बँक गॅरंटी जमा करायला लावली. पण उपयोग काहीच होत नाही.

दौलत जगताप म्हणतात, आम्ही 20/25 वर्षांपासून केंद्रातील उर्जामंत्री, राज्यातील उर्जा मंत्री, चेअरमन, अधिकारी सगळ्यांना भेटलो, 10 वेळा पंचनामे झाले, लॅबचे रिपोर्ट आले पण आतापर्यंत कोणतीही कारवाई नाही.

मात्र याला कारण सरळ आहे. एकलहरे केंद्रातल्या या राखेचं कंत्राटं नाशिकमधल्या राजकीय नेत्यांच्याच नातलगांनी घेतली आहेत. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीसुद्धा. म्हणूनच या शेतकर्‍यांचे प्रश्न भिजत पडले आहे.

close