भाव न मिळाल्यामुळे 40 टन टोमॅटो फेकण्याची वेळ

August 3, 2011 2:44 PM0 commentsViews: 17

03 ऑगस्ट

बाजारभाव कोसळल्याने बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो सोडून देण्याची वेळ नारायणगाव इथल्या बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांवर आली. टोमॅटो निर्यातीसाठी देशभरात प्रसिध्द असलेल्या या बाजार समितीत दररोज 35 ते 40 टन पिकलेले टोमॅटो बाजार समितीला गटारात फेकून द्यावे लागत आहेत.

त्यामुळे पुणे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना दररोजच कोट्यवधीच्या रुपयाचे नुकसान सोसावे लागत आहे. आंबेगाव तालुक्यात यंदा सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड झाली आहे. गेल्या चार वर्षात टोमॅटोला चांगले भाव मिळत असल्याने यंदा लागवड क्षेत्रात 8 ते 10 पटीने वाढ झाली. 20 किलोच्या क्रेटला सध्या 30 ते 60 रुपये भाव मिळतोय.

कधी-कधी तर व्यापारी शेतकर्‍याला विचारत सुध्दा नाही. त्यामुळे टोमॅटो तिथेच सोडून माघारी फिरकण्याची वेळ शेतकर्‍यावर येते. फेकून दिलेल्या टोमॅटोची विल्हेवाट लावण्यातच बाजार समितीचा वेळ जातो. आणि या फेकून दिलेल्या टोमॅटोवर जनावरे मात्र मनसोक्तपणे ताव मारतानाचे चित्र सध्या नारायणगावामध्ये पहायला मिळते.

close