बोरोलेंचा प्रताप, फरार असतानाही केली जमीन खरेदी !

August 3, 2011 2:53 PM0 commentsViews: 12

03 ऑगस्ट

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंचे फरार जावई पंकज बोरोले, यांनी फरार असतांना जमीन खरेदी केल्याचे प्रकरण उघडकीस आला. हजारो ठेवीदांराना गंडा घालणार्‍या तापी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी पतसंस्थेचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश बोरोले आणि त्यांचा मुलगा पंकज बोरोले गेल्या सहा महिन्यापासून फरार आहेत.

पण फरार असतानाही गेल्या 21 जूनला पंकज बोरोले यांनी खालापूर येथील दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जाऊन जमीन खरेदीखताची पॉवर ऑफ ऍटर्नी बनवली. पोलिसांना गुंगारा देणारी व्यक्ती सरकारी कार्यालयात जाऊन पॉवर ऑफ ऍटर्नी कशी काय बनवू शकते ? फरार पंकज बोरोले यांना कुठेही जमीन खेरदी करण्यास त्यांना महसूल खातं आणि गृहखातं मदत करतंय का ? पोलीस यंत्रणा इतकी कशी कुचकामी झालीय ? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

आयबीएन – लोकमतच्या हाती लागलेल्या खरेदी खताच्या सत्यप्रतीनुसार, डॉ. सुरेश बोरोले यांची पत्नी हेमलता बोरोले यांनी गेल्या जून महिन्यात खालापूरमधील खरंसुडी येथे 55 गुंठे म्हणजे जवळपास सव्वा एकर जमीन विकत घेतली. हेमलता बोरोले यांच्या वतीने त्यांचा मुलगा पंकज बोरोले याने खरेदी खताची पॉवर ऑफ ऍटर्नी केली. गेल्या जून महिन्याच्या 21 तारखेला खालापूरच्या दुय्यम निबिधक कार्यालयात जाऊन पंकजने पॉवर ऑफ ऍटर्नी केलीय, हे स्पष्ट झालंय.

close