महागाईच्या मुद्द्यावर लोकसभेत खडाजंगी चर्चा

August 3, 2011 5:25 PM0 commentsViews: 4

03 ऑगस्ट

महागाईच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज खडाजंगी चर्चा झाली. विरोधकांनी सरकारवर चौफेर तोफ डागली. भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी या चर्चेला सुरुवात केली. यूपीए सरकार सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. महागाई हा गरिबांवर लादलेला सर्वात वाईट टॅक्स असल्याचे ते म्हणाले.

जर, विकासदरामुळे महागाई वाढत असेल तर असा विकास दर आपल्याला नको असं मत त्यांनी व्यक्त केलं. तर, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी डिझेल हा शेतकर्‍यांचा शत्रू असल्याचं म्हटलं. डिझेलला सबसिडी देण्यापेक्षा शेतकर्‍यांना सबसिडी देण्याची मागणी त्यांनी केली. पाश्चात्य देशांच्या धोरणांची कॉपी आपण करून चालणार नाही.

आपल्या गरज वेगळ्या असल्याचे ते म्हणाले. विरोधकांच्या आरोपांना सरकारकडून कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी उत्तर दिलं. महागाई ही केवळ भारताची समस्या नाही ती जगभराची समस्या असल्याचे ते म्हणाले. सरकार अनेक उपाय योजना करत आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर महागाईच्या मुद्द्यावर भाजप आणि काँग्रेसमध्ये डील झाल्याचा आरोप डाव्या पक्षांनी केला. उद्या या मुद्द्यावर मतदान होणार आहे.

close