कलमाडींच्या नेमणुकीवरून काँग्रेससोबतच भाजपवरही ठपका

August 3, 2011 5:34 PM0 commentsViews: 4

03 ऑगस्ट

कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडींना काँग्रेसनं निलंबित केले. पण त्यांच्यामुळे पक्षाला आणि केंद्र सरकारला रोज नव्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आयबीएन नेटवर्कच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रं लागली आहेत. त्यानुसार, मंत्रिगटाच्या कागदपत्रात अफरातफरी करून त्यांना अध्यक्षपदापर्यंत पोचायला कुणीतरी मदत केल्याचं उघड होतंय. पण भाजपही यात मागे नाही. कारण कलमाडींना अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव भाजपच्या नेत्याने मांडल्याचंही या कागदपत्रांवरून उघड झाले.

कलमाडी जेलमध्ये असतीलही पण वाद काही त्यांची पाठ सोडत नाहीय्. सुरेश कलमाडींची कॉमनवेल्थ आयोजन समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक कुणी केली. हा वादाचा विषय झाला. क्रीडा मंत्री अजय माकन यांनी ही जबाबदारी आधीच्या एनडीए सरकारवर ढकलली.

पण आयबीएन नेटवर्कच्या हाती आलेली कागदपत्रं वेगळीच माहिती पुढे आणतं 2004 साली. तत्कालीन क्रीडा मंत्री सुनील दत्त यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलं होतं की कुणीतरी मंत्रिगटाच्या बैठकीचे मिनिट्स बदलले आणि कलमाडींना अध्यक्षपद मिळवून द्यायला मदत केली. 'ऑर्गनायझिंग कमिटी'च्या ऐवजी कुणीतरी 'अपेक्स कमिटी' असा शब्द बेमालूमपणे बदलल्याचं दत्त या पत्रात म्हणतात.

यूपीए सरकारच्या काळात हा घोळ झाला असला, तरी भाजपही मागे नाही. इंडियन ऑलिंपिक असोसिएशनच्या 2008 साली झालेल्या बैठकांचे मिनिट्स आमच्या हाती लागलेत. यानुसार कलमाडींच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या विजय कुमार मल्होत्रांनी ठेवला. आणि त्यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली. एकूणच. कलमडींना मोकळं रान द्यायला भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जबाबदार असल्याचे या पत्रांवरून दिसतंय.

close