सव्वातीन वर्षांच्या चिमुरडीला हवा मदतीचा हात

August 6, 2011 12:13 PM0 commentsViews: 2

अलका धुपकर, मुंबई.

06 ऑगस्ट

एकीकडे मुलींना जन्माआधीच मारलं जातंय आणि मुलींच्या घटणार्‍या संख्येंबद्दल चिंता व्यक्त केली जातेय. पण मुंबईमध्ये एका चिमुकलीचे आई-बाबा गेले 11 महिने तिच्या आरोग्यासाठी वणवण फिरत आहेत. हसती खेळती मुलगी तापाच्या साथीत पांगळी झाली. तिचा मेंदूच बधीर झाला आहे. पण पोटच्या मुलीवरची या आईबापाची माया जराही कमी झाली नाही. गरिबीपुढे न झुकणार्‍या या आई-बापाची ताकद आहे ती त्यांच्या पोरीवरची माया.

11 महिन्यांपूर्वी सेजलला फणफणून ताप आला. आणि तापानंतर पूर्वीची सेजल हरवून गेली. दिवसभर चाळीमध्ये फिरणारी सेजल आता निपचित अंथरुणात पडून असते. स्वत:चा तोलही तिला सावरता येत नाही. पूर्वी तिची बडबड थांबायचीच नाही. पण आता तिच्या तोंडातून चकार शब्द निघत नाही. 'एनसेफेलायटिस' ची ती पेशंट ठरली आहे. म्हणजेच तापानंतर तिच्या मेंदूला दुखापत झाली.

वरळीच्या प्रेमनगर चाळीमध्ये आठ बाय बाराच्या खोलीत कृष्णा आणि संजना परब यांचे कुटुंब राहते. सेजलच्या उपचारासाठी त्यांना महिन्याला सहा हजार रुपयांचा खर्च येतो. तर तिच्यासोबत उपचारांसाठी कराव्या लागणार्‍या धावपळीत महिन्याचे वीस दिवस नोकरीवर जाता येत नाही. त्यामुळे सेजलच्या उपचारांचा खर्च भागवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला.

पुढची सलग तीन वर्ष सेजलवर हे महागडे उपचार सुरु राहणार आहेत. आईबाबांच्या मायेसोबतच मदतीचे हात पुढे आले तर सेजलला बरं करण्याचे या दोघांचे स्वप्न लवकर पूर्ण होईल.

सेजलसाठी मदतीचं आवाहन

सेजल परब या सव्वातीन वर्षांच्या मुलीवर केईएम आणि कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. आपण सेजलला मदत करू शकता.

कृष्णा तुकाराम परबमोबाईल नंबर- 9892730224पत्ता- रुम नंबर 489, जय भवानी क्रीडा मंडळ, प्रेमनगर, बी. जी. खेर रोड, वरळी पश्चिम, मुंबई 400018

close