संमेलनाचा हिशेब पुन्हा चव्हाट्यावर

August 6, 2011 3:57 PM0 commentsViews: 2

06 ऑगस्ट

सिंगापूर इथं होणार्‍या तिसर्‍या विश्व साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने 50 लाख रुपयांचा निधी दिला. पण पहिल्या आणि दुसर्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने दिलेल्या प्रत्येकी पंचवीस लाखांच्या निधीचा हिशेबच सरकारला मिळालेला नाही.

विश्व साहित्य संंमेलनाच्या निमित्ताने देशाबाहेरच्या मराठी माणसांशी साहित्यिक आणि वैचारिक आदानप्रदान होईल. या उदात्त हेतूने राज्य सरकारने हा निधी दिला. पण या निधीच्या खर्चाची आकडेवारीच सरकारकडे उपलब्ध नाही. पण निधी दिला नाही तर टीका होईल या भीतीपोटी राज्य सरकारकडून विश्व साहित्य संमेलनासाठी निधी दिला जातोय अशी चर्चा आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाबाहेर भरविण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा निर्णय वादाच्या भोवर्‍यात अडकल्यानंतर विश्व मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना पुढे आली. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेतल्या सॅन होजे इथं पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन पार पडलं.

त्यानंतर दुबई इथं कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं मराठी साहित्य संंमेलन पार पडलं. या दोन्ही संमेलनासाठी राज्य सरकारने प्रत्येकी पंचवीस लाख रूपयांचा निधी दिला. विशेष म्हणजे दुबईतल्या संमेलनासाठी तर मसालाकिंग धनंजय दातार यांनीही मोठी आर्थिक मदत केली.

पण या संमेलनासाठी देण्यात आलेल्या निधीचा खर्चच राज्य सरकारला मिळालेला नाही. त्यामुळे आयोजन समिती सरकारकडून घेत असलेल्या निधीचा नेमका काय विनियोग करते याकडेही साहित्यिकांचे मराठी वाचकांचे लक्ष लागले आहे.

close