बिबट्याने दिला झोपडीत तीन बछड्यांना जन्म

August 7, 2011 2:35 PM0 commentsViews: 2

07 ऑगस्ट

बिबट्यांची नैसर्गिक ठिकाणे नाहीशी होत आहेत. त्यामुळे बिबट्याने गावात शिरून नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना वारंवार घडत असतात. पण रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यातील येरवंडे गावातल्या मादी बिबट्याने एका शेतकर्‍याच्या झोपडीतच तीन पिल्लांना जन्म दिला. सुधीर बने यांच्या घराशेजारी असलेल्या लाकूडफाटा ठेवण्याच्या जागेत या मादी बिबट्याने तीन पिल्लांना जन्म दिला.

बने यांच्या घरी इलेक्ट्रीक पंपाचे काम करायला गेलेल्या दोन वायरमन्सना ही पिल्लं दिसली. त्यानंतर ही पिलं पाहण्यासाठी तिथं गावकर्‍यांनी गर्दी केली. पण त्याचवेळेस तिथं आलेल्या या मादी बिबट्याने या गावकर्‍यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यातून आयबीएनलोकमतचे प्रतिनिधी संदीप कांबळेही सुदैवाने बचावले.

ही घटना वनविभागाच्या अधिका-यांना कळवून पाच तास होऊन गेले तरी अजूनही हे अधिकारी इथे आलेले नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या या लांजा भागात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे आता हे बिबटे अनेकदा मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. यामुळे येथील गावकरी भयभीत झाले आहेत.

close