सेन्सेक्स डाऊन ; सोने अप

August 8, 2011 6:08 PM0 commentsViews: 3

08 ऑगस्ट

जगभरातील शेअर बाजार सध्या संकटात सापडले आहेत. अमेरिकेचं क्रेडिट रेटिंग कमी केल्यामुळे आज गुंतवणूकदारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. भारतही याला अपवाद नव्हता. अमेरिका, युरोप आणि आशियातील सर्व बाजारात आज मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 17 हजारांच्या खाली गेला. तर दुसरीकडे सोन्याचा दर 25 हजारावरुन 25,180 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला. 3 दिवसाअगोदर सोनं 24,500 वर पोहोचलं होतं.

भारतीय बाजारांवर परिणाम होऊ नये. म्हणून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी तातडीने गुंतवणुकदारांशी संवाद साधला. अमेरिकेतल्या घडामोडींचा भारतावर परिणाम होत असला, तरी आपली अर्थव्यवस्था भक्कम आहे. आणि त्यामुळे आपली परिस्थिती इतर देशांपेक्षा चांगली आहे असा दावा त्यांनी केला.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि आज मुंबई शेअर बाजारात मोठी पडझड झाली. त्यामुळे जे छोटे गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सर्वसामान्यपणे गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जाणार्‍या ब्ल्यू चीप शेअर्सचीच पडझड होतेय. त्यामुळे नेमकी गुंतवणूक कुठं करायची हा प्रश्न छोट्या गुंतवणुकदारांना पडला.

अमेरिकेची वित्तीय पत घसरल्याचा परिणाम आज जगभरातील शेअर बाजारांमध्ये पाह्यला मिळाला. आज सकाळी टोकियो, हाँगकाँग, कोरिया, शांघाई इथल्या शेअर बाजारात 3 ते 4 टक्के घसरण झाली, त्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजार सुरु झाल्याबरोबर सेन्सेक्स आणि निफ्टी मोठी घसरण झाली.

शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे काही ब्ल्यू चीप शेअर्सही जोरदार आपटले. शेअर्स घसरलेल्या कंपन्यांमध्येमुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स, इन्फोसिस, टीसीएस, डीएलएफ, हिंदाल्को, टाटा स्टील, विप्रो आदी शेअर्स 3 ते 4 टक्क्यांनी घसरले. तर निफ्टीमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजी, टाटा मोटर्स, हिंदाल्को, इन्फोसिस, टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 4 ते 5 टक्के घसरण पाह्यला मिळाली.

बाजारातल्या पडझडीमुळे काही बड्या कंपन्यांचे शेअर्स तर गेल्या 52 आठवड्यामध्ये त्यांच्या शेअर्सनी निच्चांकी दर गाठला. त्याकंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस. जागतिक स्तरावर शेअर बाजारांमध्ये घसरण होत असताना, त्याचा परिणाम आपल्याला भारतीय शेअर बाजारामध्ये आणखी काही दिवस पाह्यला मिळेल, असं शेअरबाजार तज्ज्ञांना वाटते. सध्या बाजारात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर छोट्या गुंतवणुकादारांना बाजारातल्या गुंतवणुकीपासून दूर राहणेच योग्य वाटते.

आज सकाळी बाजारात झालेल्या पडझडीनंतर युरोपीय बाजारात सुधारणा दिसून आल्याने, त्याचा चांगला परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसला. पण आज बाजार बंद होण्याच्या शेवटच्या सत्रात पुन्हा मोठ्याप्रमाणात शेअर्सची विक्री झाल्याने निर्देशांक घसरला आणि शेअर बाजार 16990 बंद झाला.

close