मावळमध्ये तणावपूर्ण शांतता

August 10, 2011 9:46 AM0 commentsViews: 4

10 ऑगस्ट

मंगळवारच्या आंदोलनानंतर मावळ भागात आता तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांच्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला. घरातली कर्ती व्यक्तीच गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. पोलिसांविरोधात इथल्या लोकांमध्ये संतापाची भावना आहे. पोलिसांनी थेट गोळीबार केल्याचा आरोप लोकांनी केला.शेतकर्‍यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि मंगळवारी मावळ पेटले. गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीनं परिसर हादरला. केवळ आंदोलकांनीच नाही तर पोलिसांनाही गाड्या फोडल्या. नेम धरून लोकांवर गोळीबार केला. त्यात 3 आंदोलकांचा मृत्यू झाला.मंगळवारच्या या घटनेनंतर बुधवारी मावळ परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. ज्या तिघांचा यात मृत्यू झाला, त्यात येळसे गावच्या कांताबाईंचा समावेश आहे. येळसे गावात शोककळा पसरली. लोकांमध्ये संतापाची भावना आहे.येळसे गावासारखीच स्थिती सडवली आणि शिवणे गावांचीही आहे. शिवणे गावातल्या मोरेश्वर साठे आणि सडवली गावातल्या शाम वाघू तुपे यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालाय. घरातल्या कर्त्या माणसाचा मृत्यू झाल्याने त्यांचे सर्व कुटुंबच उघड्यावर पडले. ज्या पवनेच्या पाण्यावरून हे आंदोलन पेटले त्या पवनेच्या काठीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आंदोलनात जखमी झालेल्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी थेट लोकांवरच गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केला.मंगळवारच्या आंदोलनात शेतकर्‍यांसोबतच पोलीसही जखमी झालेत. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधल्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. इकडे मावळ आणि परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तणाव कमी करण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनीच्या कामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. पण, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मावळ परिसरातल्या शेतकर्‍यांनी व्यक्त केला.

close