पालिकेच्या निवडणुकीत महिलांसाठी 114 जागा राखीव

August 10, 2011 1:22 PM0 commentsViews: 13

10 ऑगस्ट

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजायला लागले आहेत. महानगर पालिकेच्या 227 जागांची सोडत आज निघाली. स्थानिक स्वराज्य संस्थासाठी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय पहिल्यांदाच लागू झाला आहे. त्यामुळे 114 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षणाचा निर्णय लागू झाल्यानंतर महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षित होणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली. त्यामुळे अनेक इच्छुक महिलांना नगरसेवक होण्याची संधी मिळणार असल्याने त्या खूश आहेत.

पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होणारी ही निवडणूक मुंबईच्या आणि राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण देणारी असेल. कारण या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत 50 टक्के महिला नगरसेवक असणार आहेत. आज महिलांसाठीच्या वॉर्डांचे आरक्षण जाहीर झाले. यात सगळ्याच पक्षांच्या दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गेल्याने त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले आहे.

या सोडतीमध्ये सगळ्याच पक्षांच्या दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांचं राजकीय भवितव्य टांगणीला लागलं आहे. यात शिवसेनेचे सभागृह नेते सुनिल प्रभू, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांचे वॉर्ड राखीव झाले आहेत. अशीच परिस्थिती भाजपामध्येही आहे.

भाजपाचे नगरसेवक आशिष शेलार, प्रवीण छेडा, भालचंद्र शिरसाठ यांचे वॉर्डही महिलांसाठी राखीव झाले आहेत. मनोज कोटक यांचा वॉर्डही महिलांसाठी राखीव झाला आहे. त्याबरोबरच राष्ट्रवादी गटनेतेे नियाज वणू यांचा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला आहे.

तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजहंस सिंग, समीर देसाई, रवी राजा तर मनसेचे नगरसेवक आणि आमदार मंगेश सांगळे यांचा वॉर्डही महिलांसाठी राखीव झाला आहे. तर यापूर्वी जे वॉर्ड महिलांसाठी राखीव होते ते खूले झाल्याने त्यामुळे इथं चुरशीच्या लढती पहायला मिळतील.

महापौर श्रद्धा जाधव यांचा वॉर्ड खुला राहिल्यानं त्या याच वॉर्डातून निवडणूक लढवतील. पहिल्या फळीतील नेत्यांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. पण या आरक्षणामुळे राजकीय गणित बदलतील हे मात्र नक्की.

close