‘मावळ’वरून गदारोळ ; गोंधळातच 3 विधेयक मंजूर

August 11, 2011 10:00 AM0 commentsViews: 6

11 ऑगस्ट

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सलग तिसर्‍या दिवशीही गाजलं ते मावळ गोळीबार प्रकरणावरुन. या मुद्यावर विरोधक आक्रमक झाल्याने विधान परिषद आणि विधानसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. दरम्यान उद्या राज्यपालांची भेट घेऊन सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

तसेच या गोळीबार प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही खडसेंनी सांगितले. सरकारने तीन विधेयक गोंधळातच चर्चेशिवाय मंजूर करुन घेतली. मावळ गोळीबार प्रकरणाच्या चौकशीसाठी येत्या 8 दिवसांत निवृत्त न्यायाधीश नियुक्ती करणार असल्याची घोषणा आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदेत केली.

या चौकशीमध्ये जर पोलीस दोषी आढळले तर त्यांच्याविरुध्द 302 खाली गुन्हा दाखल करणार असल्याचंही आर आर पाटील यांनी सांगितले. पण गोळीबाराला जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांना निलंबित करेपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला.

विरोधक आंदोलक मोरेश्वर साठे प्रकरणाची मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार आहेत. यासाठी त्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. राज्यपाल सध्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत आणि आज दुपारी ते पुण्याहून परत येतील.

मावळ गोळीबार प्रकरणात पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला होता. त्याचे पडसाद आज विधासभेतही उमटले. विधासभेत मावळ गोळीबार प्रकरणावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. त्यानंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज या मुद्दावरून 5 वेळा तहकूब करण्यात आलं.

close