विरोधक गोंधळात ; 11 विधेयकासह अधिवेशनाची सांगता

August 12, 2011 4:17 PM0 commentsViews: 5

12 ऑगस्ट

सरकारी अनास्था आणि विरोधकांच्या गदारोळात पावसाळी अधिवेशन आज संपले. या अधिवेशनात शालेय फी नियंत्रण, खासगी विद्यापीठ यासारखी 11 महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेण्यात आली. पण विधिमंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षी पार पडलेल्या या अधिवेशनात लोकांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागू शकले नाहीत. एकीकडे सरकारी पक्षाकडून निराशा झाली असतानाच समन्वयाच्या अभावामुळे विरोधकही आपला प्रभाव दाखवू शकले नाहीत. मुंबईतील 13 जुलैच्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभुमीवर पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. यासह इतर अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरतील, अशी सुरुवातीला चिन्ह होती. पण तसं झालं नाही. अधिवेशनाच्या प्रत्येक आठवड्यात गोळीबाराच्या घटना घडल्या. पण मावळ प्रकरणी विरोधक जेवढे आक्रमक दिसले, तेवढी आक्रमकता पहिल्या दोन घटनांमध्ये विरोधकांना दाखवता आली नाही.

अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांबाबत सरकारडून चौकशीचे आदेश मिळाले.

- मुंबईतल्या नालेसफाईची सीआयडी चौकशी – जळगाव जिल्हा बँक घोटाळ्याची सीआयडी चौकशी – नवी मुंबईतल्या अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश – निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणं प्रकरणाची चौकशीचे आदेश सरकारने दिले.

पण गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा जाहीर करता आला नाही. शिवाय अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईबाबतही कोणतेच आश्वासन सरकारने दिले नाही. सरकारने फारशी चर्चा न करताच 3 हजार 356 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या. अधिवेशनात 11 विधेयक मंजूर करून घेण्यात आली. यामध्ये- शिक्षण शुल्क नियंत्रण विधेयक – खासगी विद्यापीठ विधेयक- पतपेढ्यावर अंकुश ठेवण्यासाठी सहकार खात्याचे विधेयक – कर्मचार्‍यांच्या संपाला चाप लावणारे महापालिका सुधारणा विधेयक – नरबळी, अघोरी प्रथा, जादूटोणाविरोधी विधेयक अधिवेशनात मांडले

विधिमंडळात चर्चा तर झाल्या. पण, सरकारी अनास्था आणि विरोधकांच्या बेबनावामुळे चर्चेतून जनतेच्या हाती विशेष काही लागले नाही. उलट या अधिवेशनात विरोधकांच्या अरेला मंत्र्यांनी कारेनंच उत्तर दिल्याचे दिसून आलं. अखेर सरकार बरखास्तीची मागणी घेऊन विरोधक राज्यपालांकडे गेले. एकूण अमृतमहोत्सवी वर्षातील हे अधिवेशन निराशाजनकच ठरले असे म्हणावे लागेल.

close