अण्णांची तिहार कारागृहात रवानगी

August 16, 2011 12:25 PM0 commentsViews: 11

16 ऑगस्ट

अण्णा हजारे यांचे आंदोलन चिरडल्यानंतर पोलिसांनी अण्णांना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. कलम 144 तोडल्याचा दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. अण्णांनी लेखी बँाड द्यायला नकार दिल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. अण्णांसोबत अरविंद केजरीवाल, मनिष शिसोदिया, नवीन जयसिंग, सुरेश पठारे, दादा पठारे, दर्शक यांनाही तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

अखेर अण्णा हजारे यांना अटक करून त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली. 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना देण्यात आली. अण्णांसह त्यांच्या सहा समर्थकांनाही तिहारमध्ये पाठवण्यात आले. सकाळी अण्णांना ताब्यात घेतल्यापासूनच देशभरात जनआंदोलनाचा भडका उडाला. ठिकठिकाणी रॅलीज, मोर्चे काढून सरकारचा निषेध करण्यात आला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेचजण या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.सरकारने मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत आपल्या कारवाईचं समर्थन केले. अण्णांना तिहार जेलमध्ये घेऊन जाताना अण्णांच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. तर दुसरीकडे कपिल सिब्बल यांच्या सभेतही अण्णांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. सिब्बल यांना काळे झेंडे दाखवत त्यांनी निषेध व्यक्त केला.

आज सकाळी दिल्ली पोलिसांनी अण्णा हजारे यांना त्यांचे नियोजित आंदोलन सुरू होण्याआधीच अटक केली. अण्णा हजारे यांना प्रतिबंधात्मक कायद्याखाली अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. आयपीसी 107 /51 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. जामीन मिळवण्यासाठी त्यांना दंडाधिकार्‍यापुढे हजर केले जाणार आहे. दिल्लीतल्या सुप्रीम इनक्लेव्ह मधून सकाळी 7.30 च्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. 'मला का अटक करण्यात येतीये, माझा गुन्हा काय, मी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलं नाही' असं अण्णा पोलिसांना सांगत होते. पण त्यांना न जुमानता , आम्हाला वरून आदेश देण्यात आले आहेत असं सांगत दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली.

अण्णा हजारे यांना अटक केल्यानंतर आता दिल्लीच्या राजौरी गार्डन पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. अण्णांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनबाहेर जमायला लागले आहेत. पोलीस स्टेशनचा परिसर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीनी दणाणून सोडला आहे. आज सकाळी त्यांना सुप्रीम एनक्लेव्हमधून अटक करण्यात आली. दिल्लीतून आतापर्यंत 1200 ते 1300 अण्णा समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

close