अण्णांना अटक करण्याशिवाय पर्याय नव्हता !

August 16, 2011 5:02 PM0 commentsViews: 3

16 ऑगस्ट

अण्णांना अटक केली नसती, तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असती असा दावा चिदंबरम यांनी केला. शांततामय आणि लोकशाहीच्या मार्गाने होणार्‍या आंदोलनाला सरकारचा विरोध नाही. पण अण्णांच्या टीमने दिल्ली पोलिसांच्या अटी नाकारल्या आणि त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली असंही ते म्हणाले.

अण्णा हजारे यांच्या अटकेनंतर सरकारने दुपारी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यासाठीच गृहमंत्री पी. चिदंबरम, दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी या तीन बड्या मंत्र्यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. आणि अण्णांच्या अटकेचं जोरदार समर्थन केलं.

सरकारला केवळ अण्णांचीच काळजी नाही. तर आंदोलनाच्या परिसरात राहणार्‍या लोकांना त्रास होऊ नये याचीही काळजी घ्यायला हवी असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं. भ्रष्टाचार दूर व्हायला हवा असं सरकारलाही वाटते. पण लोकपाल विधेयक संसदेत आहे. तिथं निर्णय होईपर्यंत अण्णांनी वाट पाहायला हवी.

आपण म्हणतो तेच विधेयक अशी अण्णांची भूमिका चुकीची आहे असा सूर कपिल सिब्बल आणि चिदंबरम या दोघांनीही लावला. यावर पि.चिदंबरम म्हणतात, आम्ही शांततापूर्ण आंदोलनाच्या विरोधात नाही. काही अटींवर आंदोलनाची परवानगी दिली जाते. जगात कुठेही अटींशिवाय आंदोलनाला परवानगी दिली जात नाही. आंदोलनं झाली पाहिजेत पण काही अटी मान्य केल्याच पाहिजे.

close