काँग्रेस विरुध्द अण्णा झाल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

August 17, 2011 5:52 PM0 commentsViews: 3

आशिष जाधव, मुंबई

18 ऑगस्ट

अण्णांचं आंदोलन हातळण्यात चुक केल्यामुळे आता, केंद्र सरकारचीचे कोंडी झाली आहे. पण अण्णांना समजवण्यासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची मदत घेतली असती तर हे वादळं थोपवता आलं असतं असं आता काँग्रेसमध्येचं बोललं जातं आहे. त्यातचं काँग्रेस विरुद्ध अण्णा असं चित्र निर्माण झाल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.

जन लोकपाल विधेयकाच्या आंदोलनाच्या निमित्ताने बघता बघता महाराष्ट्राचे अण्णा, संबंध देशाचे अण्णा बनले. पण केंद्रातील यूपीए सरकार मात्र अण्णांना हटवादी ठरवतं आहे. खरं तर अण्णांची भूमिका नेहमीच एखाद्या गांधीवाद्याप्रमाणे मध्यममार्गी राहिली. एखाद-दुसरी मागणी पदरात पाडून पुढं जायचं असेच त्यांचे धोरण राहिले. त्यामुळे आंदोलनाचा इशारा दिल्यावरही सरकारबरोबर चर्चेची तयारी अण्णांनी वेळोवेळी दाखवली. महाराष्ट्रात तर अण्णांच्या या भूमिकेचा प्रत्यय अनेकवेळा आला.

गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये अण्णांनी अनेकवेळा महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारची शाळा घेतली. राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. पण बाळासाहेब थोरातांच्या मध्यस्थीने वेळोवेळी अण्णांची मनधरणी करण्यात आली. म्हणजेच यशस्वी मध्यस्थी आणि मागण्यांच्या पाठपुराव्यांमुळे तब्बल सलग पाचवेळा अण्णांना आपले राज्यव्यापी आंदोलन पुढे ढकलावे लागले.

पण एकाएकी काँग्रेसच्या दिल्लीश्वरांचा आणि नव्या मुख्यमंत्र्यांचा अण्णांविषयीचा दृष्टिकोनच बदलला. गेल्या एप्रिल महिन्यात एकदाच काय तो पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत अण्णांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर काँग्रेस हायकमांडने अण्णांशी सख्य असलेल्या विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे किंवा राज्यातल्या अन्य कोणत्याही नेत्याला अण्णांशी संपर्क साधण्यास सांगितले नाही.

तर दुसरीकडे शरद पवारांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्यानंही काँग्रेसश्रेष्ठींना अण्णांच्या बाबतीत कुठलाच सल्ला दिला नाही. त्यामुळे साहजिकच अण्णांच्या मनधरणीचे कुठलेच प्रयत्न झाले नाहीत. आता ही खंत राज्यातल्या काँग्रेसजणांकडून व्यक्त व्हायला लागली आहे.

बघता बघता झपाट्याने देशभर अण्णा विरुद्ध काँग्रेस असं चित्र तयार व्हायला लागले आहे. त्यामुळे यातून वेळीच मध्यममार्ग काढला नाही तर काँग्रेसला मोठी किंमत मोजावी लागेल. अशीही चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.

close