गोळीबाराची घटना चुकीची- राहुल गांधी

August 18, 2011 5:33 PM0 commentsViews: 3

18 ऑगस्ट

अण्णांची तिहार तुरूंगातून सुटका करण्याच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावणारे राहुल गांधी आज महाराष्ट्रात दाखल झाले. पवना आंदोलनाच्यावेळी गोळीबाराची घटना घडलेल्या मावळचा त्यांनी आज दौरा केला. सडवली आणि शिवणी या गावांना भेटी देऊन त्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली.

गोळीबार झाला त्या जागेचीही त्यांनी पाहणी केली. राहुल गांधींनी पवना नगर, येळशी, मावळ इथे जाऊन आंदोलनातील बळी मोरेश्वर साठे, कांताबाई ठाकर आणि श्यामराव तुपे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तिथल्या शेतकर्‍यांशीही त्यांनी संवाद साधला.

नक्की घटना काय घडली, याबद्दलही त्यांनी गावकर्‍यांकडून माहिती घेतली. गोळीबाराची घटना चुकीची असल्याचं ते म्हणाले. तळेगावला जात असताना राहुल गांधींचा तिथला दौरा अचानक रद्द झाला त्यामुळे तळेगावमध्ये थोडीशी नाराजी होती.

9 ऑगस्ट रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मावळ येथे शेतकर्‍यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात 3 आंदोलक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. आंदोलक शेतकर्‍यांवर पोलिसांनी थेट गोळीबार केला होता. एव्हान शेतकर्‍यांचा पाठलाग करून गोळीबार करण्यात आला.

पोलिसांनी खुद्द वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेने राज्यघरात एकच खळबळ उडाली होती. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. आणि गोंधळातच अधिवेशनची सांगता झाली. या प्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली.

याचबरोबर 2 पोलीस अधिकारी आणि 6 पोलीस हवालदारांना निलंबित केले आहे. शेतकर्‍यांवर एवढा मोठा पोलिसी अत्याचार झाला तरी राहुल गांधी कुठे आहेत ? भट्टा परसौल येथे राहुल यांना जाण्यास वेळ आहे पण महाराष्ट्रात शेतकर्‍यांवर झालेल्या अत्याचाराबद्दल राहुल गांधींनी कसे काही माहिती नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत सरकारला धारेवर धरले होते.

close