अण्णांच्या उपोषणासाठी 15 दिवसांची परवानगी

August 18, 2011 7:40 AM0 commentsViews: 1

18 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या उपोषण आंदोलनाबाबतचा तिढा अखेर सुटला आहे. रामलीला मैदानावर 15 दिवसांचे उपोषण करण्याची परवानगी अखेर देण्यात आली आहे. पण आता अण्णा तिहार जेलमधून रामलीला मैदानावर उपोषण आजच सुरू करु शकतील का हे निश्चित झालेलं नाही. कारण रामलीला मैदानाच्या साफसफाईला वेळ लागण्याची शक्यता आहे.

पण दुपारी 12 पर्यंत रामलीला मैदानाचा काही भाग उपोषणकर्त्यांच्या ताब्यात देणार असून, संध्याकाळर्यंत संपूर्ण मैदान आंदोलनासाठी कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिलं जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. पण तरीही अण्णा आजच तिहार जेलमधून बाहेर पडतील का हे सांगता येणार नसल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अण्णांची प्रकृती उत्तम असून त्यांनी बाहेरच्या डॉक्टरांकडून उपचार घेण्याची गरज नसल्याचंही सांगितले अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. तसेच जनलोकपालवर संसदेत चर्चा झाली पाहिजे अशी आमची मागणी असून आता तर खरी लढाई सुरू झाली आहे असंही केजरीवाल यांनी सांगितलं.

'रामलीला'परिसरात कोंबिंग ऑपरेशन

रामलीला मैदानावर उपोषणाचा अण्णांचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मैदानावर कोंबिंग ऑपरेशन सुरु केले आहे. श्वानपथक आणि मेटल डिटेक्टर्ससह पोलीस मैदानाची कसून तपासणी करत आहे. तपासणी पूर्ण होईपर्यंत मीडियासहित मैदानात असणार्‍या सगळ्यांना सुरक्षातपासणीसाठी मैदानाबाहेर जाण्यास सांगण्यात आले.

close