रामलीला मैदान जनतेच्या लढ्याचं प्रतिक !

August 20, 2011 10:07 AM0 commentsViews: 3

20 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या उपोषणाने दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणार्‍या महत्वाच्या घटनांचे साक्षीदार असलेल्या या मैदानाचा इतिहासही वादळी घटनांनी भरलेला आहे.

रामलीला मैदान जनतेच्या लढ्याचं एक प्रतिक.. जयप्रकाश नारायण पासून ते अण्णा हजारेपर्यंत अनेक लढे या मैदानाने बघितले आहे. जनआंदोलनाचा एक इतिहास या मैदानाला आहे. दिल्लीत 10 एकर परिसरात हे मैदान पसरले आहे. 1883 मध्ये ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांच्या राहण्यासाठी हे मैदान तयार केलं होतं.

रामलीलांचे आयोजन या मैदानात होऊ लागलं आणि मैदानाला रामलीला हे नावं पडलं. लाखालाखांच्या सभा, प्रखर निदर्शनं आणि पोलिसांची दडपशाही हे सर्व या मैदानानं पाहिलं आणि पचवलं. स्वातंत्र्य चळवळ टिपेला असताना महात्मा गांधी, मोहम्मद अली जीना, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांनी याच मैदानातून ब्रिटिश सरकारविरूद्ध वणवा पेटवला.

1952 मध्ये जम्मू आणि काश्मिरच्या मुद्यावरून याच मैदानात श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी सत्याग्रह केला. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सरकारला मोठा हादरा या आंदोलनानं बसला होता. 26 जानेवारी 1963 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात लता दीदींनी गायलेलं ऐ मेरे वतन के लोगो या गाण्याने नेहरूंच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

1965 मध्ये पाकिस्तानविरूध्दच्या युध्दानंतर लालबहाद्दूर शास्त्रींनी याच मैदानात घेतलेल्या सभेत जय जवान जय किसान चा नारा दिला होता. 1972 मध्ये बांग्लादेशाच्या निमिर्तीनंतरच्या विजयोत्सवानंतरची इंदिरा गांधींची भव्य सभा याच मैदानावर झाली. याच मैदानावर जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींविरूध्द रणशिंग फुकलं.

त्यानंतर देशभर प्रचंड चळवळ उभी राहली. आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. ही घटना देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. 28 जानेवारी 1961 रोजी भारत भेटीवर आलेल्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची सभाही या मैदानानं पाहिली. काळ्या पैशांविरूद्ध बाबा रामदेव यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर केलेली दडपशाही नव्या असंतोषाची ठिणगी पडली.

जे.पी. पार्कवर होणारे उपोषण अण्णांच्या अटकेनंतर रामलीला मैदानावर सुरू झालं. आणि हे मैदान पुन्हा एकदा चर्चेत आलं. आता या मैदानात कुठला इतिहास लिहला जातो हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल.

close