अण्णांना अटक करणे ही चूक – अजित पवार

August 20, 2011 3:02 PM0 commentsViews: 5

20 ऑगस्ट

अण्णा हजारेंच्या अटकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या अण्णांना अटक करणे चुकीचे होते असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच अण्णांनी आंदोलनात जर विरोधी पक्षांना सोबत घेतले असते तर आंदोलन सर्वपक्षीय झाले असते असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. अजितदादा मुंबईत बोलत होते. तर दुसरीकडे नागरी समितीशी वागण्याची सरकारची पद्धत चुकीची असल्याचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

अण्णांच्या आंदोलनावरून काँग्रेसपक्षात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. काल शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थिती करण्याची तयारी दर्शवली. आज मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णांच्या आंदोलनावर केल्या कारवाईला चुकीचे होते असं म्हणत काँग्रेसवर टीका केली. देशातील कोणत्याही नागरिकाला आपलं मत मांडणं आंदोलन करणे हा अधिकार भारतीय राज्यघटनेने सर्वांना दिला आहे. पण अण्णांना उपोषण करण्याआधीच अटक करण्यात आली.अण्णांना अटक करणे हे चुकीचे आहे. अगोदर अटक करणे आणि वाढता लोकांचा पाठिंबा बघून अण्णांना स्वत:चं सोडून देणे हे काही योग्य नाही. अण्णांनी एक महिन्याअगोदरच सांगितले होते की उपोषण करणार आहे. तरी सुध्दा ही कारवाई केली ही खरंच चुकीचे होते. असं अजितदादा म्हणाले. तसेच जर अण्णांनी आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना सोबत घेतले असते तर अण्णांचे आंदोलन सर्वपक्षीय आंदोलन झाले असते असं मत ही अजितदादांनी व्यक्त केलं.

close