जनलोकपालवर उद्या संसदेत चर्चा

August 25, 2011 12:40 PM0 commentsViews: 3

25 ऑगस्ट

अण्णांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. आता कोंडी फुटण्याची चिन्हं दिसत आहे. लोकपालसह जनलोकपाल मसुद्यावर उद्या संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. पण, सक्षम लोकपाल आणण्याचा प्रस्ताव संसदेत मंजूर झाल्यानंतरच अण्णा उपोषण सोडतील असं किरण बेदी यांनी स्पष्ट केले.

आज दुपारी विलासराव देशमुखांकडून अण्णांनी पंतप्रधानांना आपला निरोप पाठवला. आपल्या तीन प्रमुख मागण्या अण्णांनी सरकारपुढे ठेवल्या. त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार अण्णांनी व्यक्त केला. त्यानंतर सरकारने जनलोकपालवर संसदेत चर्चा करण्याची तयारी दाखवली.

जनलोकपाल हा आधार मानून संसदेत चर्चा व्हावी अशी तयारी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही दाखवली. त्यामुळे सरकारचं काम सोपं झालं. दुसरीकडे उद्याची रणनीती ठरवण्यासाठी सध्या दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. अण्णांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही आपल्या निवासस्थानी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर विलासराव देशमुख अण्णांची भेट घेतील अशी शक्यता होती पण तसं काही झालं नाही. सरकारतर्फे रात्री उशिरापर्यंत अण्णांना कोणीही भेटलं नाही.

दरम्यान रामलीलावर अण्णांनी समर्थकांशी संवाद साधला. सरकारने जनलोकपाल विधेयक संसदेत मांडावे आपण उपोषण सोडायला तयार आहोत पण जोपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर होत नाही तोपर्यंत रामलीला मैदानात धरणे सुरूच राहणार आहे असं स्पष्ट केलं. आज सकाळी संसदेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निवेदन सादर केलं.

यावेळी पंतप्रधांनी अण्णांनी प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. अण्णांच्या आंदोलनालाही पंतप्रधानांनी सलाम केला. यावर अण्णांनी आभार मानत टीकाही केली. माझ्या तब्येतीची काळजी वाटते म्हणणारे पंतप्रधान दहा दिवस काय करत होते असा सवाल अण्णांनी केला.तसेच अटकेनंतर रान उठवणार्‍या विरोधकांनाही अण्णांनी खडे बोल सुनावले. विरोधी पक्ष गप्प का, असा सवाल अण्णांनी केला. जनलोकपालसाठी विरोधी पक्षांनी आग्रह धरावा असं आवाहनही अण्णांनी केलं.

close